
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱयाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांचे नावही छापण्याचे सौजन्य या सरकारने दाखवले नाही. त्यावरून संतप्त झालेल्या अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. हा कार्यक्रम भाजपचा होता की सरकारचा होता, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱया विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांचे नाव नव्हते. त्यावरून या सरकारचा समाचार घेताना अरविंद सावंत म्हणाले की, हा कार्यक्रम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेचा होता. भाजपचा नाही. दुर्दैवाने पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अनेकदा वावरताना दिसत नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम भाजपचा आहे, असे त्यांना वाटते. काही वेळापूर्वीच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मला निमंत्रण द्यायला आले होते.
या पत्रिकेवर मी सोडून मुंबईच्या पाच खासदारांचे नाव आहे. यामध्ये दोन मिंधे गटाचे आणि तीन भाजपचे आहेत. तसेच या पत्रिकेच्या पाकिटावरही माझे नाव नाही. काही दिवसांपूर्वीही मला एक निमंत्रण पत्रिका आली होती, त्यावर केवळ अरविंद सावंत असे लिहिले होते. माननीय तर सोडा, माझ्या नावापुढे साधे खासदारही लिहिले नव्हते. त्यामुळे हा कार्यक्रम कोणाचा आहे आणि कशासाठी आहे? हे अतिशय स्पष्टपणे जनतेपुढे आले आहे. हा कार्यक्रम फक्त मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.





























































