लाखो रूपये खर्चुनही परळीच्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रतिनिधी । परळी वैजनाथ

नगर परिषदेच्या वतीने शहरातील पथदिवे बसविणे व त्यांची दुरूस्ती करणे यासाठी दरवर्षी लाखो रूपये खर्चीले जातात. न. प. ने. सध्या खासगी ठेकेदाराला करारावर वार्षीक देखभालीचे काम दिलेले आहे. परंतु शहरातील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले असून याकडे संबधीत अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. नागरीकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. श्रावण महिन्यापुर्वी नगर परिषदेने शहरातील सर्वच भागातील नादुरूस्त पथदिवे सुरू करावेत अशी ही मागणी नागरीकांतून होत आहे.

वैद्यनाथ मंदीर ते आझाद चौक रोड, नवगण कॉलेज ते बसवेश्‍वर कॉलनी ग्रामीण पोलीस ठाणे रोड, नाथ रोड, गणेशपार विभाग आदी भागात अनेक पथदिवे बंद असल्याकारणाने नागरीकांना अंधाराचा सामाना करावा लागत आहे. तसेच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. न.प.च्या संबंधीत विभागास अनेकवेळा सांगुनही परिस्थीती मात्र जैसेथेच दिसून येत असल्याने आता दाद मागावी कोणाला असाच प्रश्‍न जनतेला पडला आहे. नगर परिषदेने पथदिव्याच्या देखभालीसाठी खाजगी ठेकेदाराला वार्षीक करारावर दिले असून यासाठी मात्र नगर पालीकेचेच वाहन व इतर साहित्य वापरले जात असल्याचे दिसून येत आहे. एवढे होऊनही शहरातील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य असून याकडे नगरपरिषद मात्र डोळेझाक करीत आहे. बर्‍याच ठिकाणी लावलेले एल.ई.डी.पथदिवे चालुबंद होत असून दिव्यांच्या दर्जाबाबतही नागरीकांत चर्चा होत आहे. अंधारामुळे रस्यावर अपघात ही होण्याची शक्यता आहे. तरी नगर पालीकेने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे असून परळीतील पथदिवे सुरळीत करावे अशी ही मागणी नागरीकांतून होत आहे.