
अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज येथील हेल्थ क्लिनिकजवळ शनिवारी स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना दहशतवादी हल्ला असल्याचा दावा एफबीआयने केला आहे. एफबीआयच्या लॉस एंजेलिस फील्ड ऑफिसचे सहाय्यक संचालक अकिल डेव्हिस म्हणाले की, हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. तपास संस्थांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या कारजवळ एक मृतदेह आढळला. ही गाडी अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्सची होती. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजताच्या सुमारास नॉर्थ इंडियन कॅन्यन ड्राइव्ह आणि ईस्ट ताचेवाह ड्राइव्हच्या चौकात हा स्फोट झाला. हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा खटला आहे की देशांतर्गत दहशतवादाचा, याचा तपास एफबीआय करत आहे. हा जाणूनबुजून केलेला दहशतवादी हल्ला आहे, यात काही शंका नाही. पुढील तपासात हे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे प्रकरण आहे की देशांतर्गत दहशतवादाचे हे निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले.
घटनेनंतर समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये क्लिनिकमधून दाट काळा धूर निघत असल्याचे दिसून आले आणि अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स नावाचे फर्टिलिटी क्लिनिक चालवणाऱ्यांनी सांगितले की, स्फोटात त्यांच्या क्लिनिकचे नुकसान झाले आहे. तथापि, सर्व कर्मचारी सुरक्षित होते आणि घटनेवेळी क्लिनिकमध्ये एकही रुग्ण नसल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे त्यांनी सांगितले.