Blog- संवाद घडलाच पाहिजे!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

‘जाऊदे, आपण कशाला पडायचे त्यांच्या वादात?’ असे म्हणत समाजाने बघ्याची भूमिका पत्करली आहे. त्यामुळे आधीच संवादाअभावी रुक्ष झालेली नाती परस्परांपासून दुरावत आहेत. ही दरी भरून काढण्याचे काम करत आहेत समीक्षा सचिन जाधव. त्या समुपदेशक नाहीत, परंतु हितचिंतक आहेत,
हे नक्की!

आपली व्यक्ती आपल्यापासून दुरावतेय ही भावना पूर्वी लोकांना अस्वस्थ करत असे. मात्र आता मनोरंजनाचे, संपर्काचे, गप्पांचे विविधांगी पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ‘तू नही, तो कोई और सही’ असा पवित्रा घेतला जातो. क्षणिक राग नात्यात कायमची तेढ निर्माण करतो. संवाद संपतो आणि त्याबरोबर नातेही संपते. आभासी जगतात आपण काही काळ मन रमवतो, परंतु प्रत्यक्ष जोडलेल्या नात्याची सर तिथल्या नात्यांना येत नाही. स्पर्श, शब्द, भावना यांचे मूल्य व्यक्ती दूर गेल्यावरच जाणवते. मात्र, ही उपरती झाल्यानंतरही पुढाकार कोणी घ्यायचा, हा कळीचा मुद्दा असतो. तिथे गरज असते मध्यस्थाची! ती भूमिका बजावत आहेत, समीक्षा ताई.

समुपदेशन हा त्यांचा प्रांत नाही, परंतु सामाजिक जाणिवेतून त्यांनी स्वखुषीने ही जबाबदारी पत्करली आहे. `पर्पल पॅच प्रोडक्शन हाऊस’मध्ये चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाही त्यांना लोकांच्या समस्या सोडवण्याची हौस निर्माण झाली. हा प्रवास सुरू झाला, एका ट्रॅव्हल्स कंपनीतून. तिथे व्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांचा जनसंपर्क वाढला. गप्पा, चर्चा, माहिती यांतून लोकांच्या सुख-दु:खाची देवाण-घेवाण होऊ लागली. अशा वेळी दु:खाचे जड झालेले पारडे थोडे हलके करावे, अशा विचाराने त्यांनी लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांचे कौटुंबिक प्रश्न ऐकले आणि कलहाचे मूळ शोधून दोन व्यक्तींचा संवाद घडवून आणला. फोटोपुरते हसरे असणारे चेहरे वैयक्तिक आयुष्यातही हसून-खेळून राहू लागले, हे पाहताना समीक्षाताईंना आंतरिक समाधान लाभले आणि त्यांनी हे काम जमेल तसे सुरू ठेवायचे, असे ठरवून टाकले.

ट्रॅव्हल कंपनीनंतर त्यांना मीडियामध्ये नोकरी मिळाली आणि एका रिअ‍ॅलिटी शोच्या मालिकेच्या प्रोडक्शन मॅनेजमेंटचे काम मिळाले. हाती घेतलेले काम आणि समोरून चालून आलेला शो यांचा विषय योगायोगाने सारखाच होता. भांडा, पण बोला आणि बोलून सुखी राहा, हे त्या शोचे सार होते. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील 500 कुटुंबांमध्ये डोकावण्याची समीक्षाताईंना संधी मिळाली. समस्येच्या, वादाच्या विविध छटा बघता आल्या. विसंवादात मेख नेमकी कुठे आहे, याचा मनाशीच अभ्यास सुरू झाला. परिचयातील एक-दोघांचे भांडण-तंटे यशस्वीपणे हाताळता आले. त्यानंतर समीक्षाताईंनी अनेक ठिकाणी या कार्यासाठी आपणहून पुढाकार घेतला.

वाद केवळ नवरा-बायकोत किंवा सासू-सुनेतच होत नाहीत, तर व्यक्तीगत आणि व्यावसायिक आयुष्यातही होत असतात. गैरसमजांच्या भिंती उभ्या राहिल्यामुळे नाते-संबंध ढासाळत आहेत. पूर्वी घरातली ज्येष्ठ मंडळी कौटुंबिक वाद सोडवत असत. आता छोटेमोठे वादही थेट कौटुंबिक न्यायालयापर्यंत जातात. व्यावसायिक मतभेदांमुळे टोकाचे निर्णय घेतले जातात. व्यावसायिक किंवा कौटुंबिक वातावरण कलुषित होते आणि तिढा अधिकच वाढत जातो. अशा वेळी दोन लोकांमध्ये झालेले गैरसमज, विसंवाद दूर करण्यासाठी, कोंडी फोडण्यासाठी, विषयाचा मध्य गाठण्यासाठी मध्यस्थीची गरज असते. परंतु, सद्यस्थितीत लोक अशा वाद-विवादांपासून दूर राहणे पसंत करतात आणि बघ्याची भूमिका घेत आपले मनोरंजन करून घेतात.

आताच्या पिढीला घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींचा धाक नाही, तसेच समाजाचाही दबाव राहिलेला नाही. त्यामुळे नात्यांचा पाया डळमळीत होत आहे. घरातली भांडणे सोडवण्यासाठी व्यावसायिक समुपदेशकाची मदत घेतली जाते. मात्र तिथेही `अहं’ आडवा आला, तर एकाने पुढाकार घेऊनही दुसरी व्यक्ती एक पाऊल मागे घेण्यास तयार होत नाही. समुपदेशकाचे ऐकायचे सोडून आपलीच बाजू रोखठोकपणे मांडून समोरची व्यक्ती कशी अयोग्य हे दामटावून सांगतात. अशामुळे समस्येची उकल बाजूला राहाते आणि प्रश्न अधिकच जटील होत जातात.

याबाबत समीक्षाताई त्यांचे अनुभव सांगातात, `एक सुखी दांपत्य लग्नानंतर काही वर्षांनी किरकोळ भांडणाने दुरावले. त्यांच्यात एवढे अंतर निर्माण झाले, की गर्भार अवस्थेत माहेरी गेलेली बायको, बाळंतपणानंतर मुलगी सहा वर्षांची झाली तरी सासरी परतली नाही आणि नवऱ्यानेही तिच्याशी संपर्क ठेवला नाही. पुढाकार कोणी घ्यायचा, हे ठरत नसल्यामुळे सहा वर्षं ते दोघे दूर राहिले. ही केस सोडवण्यासाठी जेव्हा मला बोलावण्यात आले, तेव्हा दोघांशी बोलून अनोळखी जागी त्यांची भेट घडवून आणली. त्या दिवशी दोघे दोन तास भांड-भांड-भांडले. परंतु, शेवट गोड झाला आणि दोघे स्वतंत्र घर घेऊन एकत्र राहू लागले.

‘तसेच एक वृद्ध दांपत्य विभक्त राहून मुलगा-सुनेची तक्रार करत होते. त्यांना उतारवयात स्वतंत्रपणे राहायचे होते, पण हा निर्णय त्यांचा होता आणि त्यासाठी ते मुलगा आणि सुनेला जबाबदार धरत होते. विभक्त राहूनही त्यांच्यात संवाद घडावा, म्हणून मी प्रयत्न केले, ते यशस्वी झाले. आज दोन्ही कुटुंबात निरोगी, आनंदी वातावरण आहे व कोणत्याही कुरबुरी नाहीत.

या किंवा अशा अनेक केसेस मार्गी लावण्यासाठी किमान 7 ते 8 महिने लागतात. लोकांची समस्या ऐकून घेऊन, त्यांची तक्रार असलेल्या व्यक्तीशी ओळख करून, वाढवून, त्यांना बोलते करायला लावून समस्येवर तोडगा काढणे, चर्चा घडवणे ही प्रक्रिया अत्यंत अवघड आहे. त्यात अनेकदा अपयशही येते. मात्र, खचून न जाता, मी प्रयत्न करत राहते. त्यामुळे आतापर्यंत 73 केसेस हाताळल्या आहेत. पैकी अनेक यशोगाथा आणि थोड्याफार अपयशगाथाही माझ्या शिदोरीत आहेत.

अनेकदा वाद मिटवण्यासाठी मानसोपचाराची गरज असते. पण त्यासाठी लोक तयारी दर्शवत नाहीत. मला काय झाले आहे? मला मानसोपचाराची काय गरज? असे प्रश्न उभे करून ते चर्चेतून पळ काढतात. मात्र, ज्यांना खरोखरच बदल अपेक्षित आहे, ते लोक हरतऱ्हेने नाते टिकवण्यासाठी धडपड करतात. अशा केसेसमध्ये मानसोपचार, औषधे, संवाद पुरक ठरतात.

कमीपणा घेतल्याने चार माणसं एकत्र येणार असतील, तर आपला `इगो’ बाजूला ठेवण्याची कला आत्मसात केली पाहिजे. समोरच्याचे ऐकून घेतले पाहिजे. विचारपूर्वक बोलले पाहिजे. कोणताही निर्णय घेताना स्वहिताचा विचार केला पाहिजे. निर्णय घेताना दहाजणांची दहा मते घेण्यापेक्षा, जाणकार किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे. निर्णयाचे पडसाद व्यक्तिगत आयुष्यावर पडतात आणि त्याला आपल्यालाच तोंड द्यायचे असते. त्यामुळे, शक्यतो दुसऱ्यांच्या विचारांनी विचार न करता, स्वत: गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. वाद छोटा असेल, तर लगेच मिटवून टाकणे. मोठा असेल तर एकमेकांशी बोलून तोडगा काढणे आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे वाटत असल्यास आप्त-नातलगांशी हितगुज करून मार्ग काढणे आवश्यक आहे. या सगळ्या टप्प्यात संवादाला सर्वाधिक महत्त्व आहे. समज आणि गैरसमज यात बरेच अंतर आहे. समज आधी आहे आणि गैरसमज नंतर आहे, असे समीक्षाताई सांगतात.

बोलायला व्यक्ती पाहिजे’ ही भविष्यात गरज निर्माण होणार आहे. आभासी जगाच्या अतिरेकामुळे संवादाची पोकळी तयार झाली आहे, त्याचे दरीत पर्यवसान होण्यास वेळ लागणार नाही. संवाद साधण्यासाठी किंवा संवाद घडवून देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. ही आपणा सर्वांचीच नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे, असेही त्या म्हणतात. भविष्यात आपल्याला पूर्णवेळ समुपदेशन करायला आवडेल, असे समीक्षाताई सांगतात. या व्यवसायाची शास्त्रोक्त माहिती नाही, परंतु लोकांप्रती आत्मीयता आहे. ही वैचारिक बैठक, शिस्त त्यांना वडिलांकडून मिळाली. ते पोलीस होते. बालपणापासून योग्य संस्कारात समीक्षाताईंची वाढ झाली. लग्नानंतर नवऱ्याची आणि सासुबाईंची साथ मिळाली, या आत्मविश्वासाचे श्रेय त्या आपल्या परिवाराला देतात. नात्यांची परिपक्वता आपण अनुभवल्यामुळे त्या इतरांनाही त्याचे महत्त्व पटवून देतात.

‘आजवर मी असंख्य नाती जोडल्यामुळे माझा म्हातारपणीचा काळ सुखात जाईल, परंतु तेव्हा जे एकाकी किंवा चिंताग्रस्त पडलेले लोक असतील, त्यांच्याशी संवाद साधायला मी उपलब्ध असेन’ अशी हमी त्या देतात. त्या सांगतात, ‘नाते तोडणे सोपे असते, परंतु निभावणे कठीण! कोणतेही नाते निभावताना संयमाचा कस लागतो. परंतु, एकदा का नातं घट्ट झालं, की ते टिकतंही आणि मुरतंही, फक्त संवाद साधता आला पाहिजे!

आपली प्रतिक्रिया द्या