सीआरपीएफच्या अधिकाऱ्याने रक्तदान करून नवजात बालकाला दिले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय नुकताच जम्मू कश्मीरमध्ये आला. श्रीनगर येथील रुग्णालयात सीआरपीएफच्या जवानाने रक्तदान करून एका नवजात बालकाला जीवदान दिले आहे. सीआरपीएफचे जवान नेहमी देशाच्या आणि जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असतात. आता या जवानाने रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

जम्मू कश्मीर येथील हंदवाडा भागात राहणारे कुटुंबावर अचानक संकट कोसळले. या कुटुंबातील नवजात बालकाला ओ निगेटिव्ह रक्तगटाची तातडीने गरज होती. जम्मू-काश्मीरमधील सद्यस्थिती पाहता तातडीने या गटाचे रक्त कसे मिळणार या चितेंत बालकाचे वडील परवेझ अहमद  होते. तातडीने या रक्तगटाची शोधाशोध त्यांनी सुरू केली. मात्र, या रक्तगटाचे रक्त मिळत नसल्याने ते अस्वस्थ झाले होते.

अहमद यांना सीआरपीएफतर्फे ‘मददगार’ या नावाने एक हेल्पलाईन चालविली जात असल्याची माहिती मिळाली. या हेल्पलाइनद्वारे ओ निगेटिव्ह गटाचे रक्त मिळू शकेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी लगेचच या हेल्पलाईनवर संर्पक साधला आणि मदतीसाठी विनवणी केली. तेव्हा सीआरपीएफच्या मदत कक्षाने याबाबतचा संदेश काश्मीरमधील सर्व युनिट्सना पाठविला. श्रीनगर येथे तैनात असलेल्या 79 कमांडिंग ऑफिसरकडेही हा संदेश आला. तेथे तैनात असलेले इन्स्पेक्टर ज्ञानचंद यांचाही तोच रक्तगट आहे. त्यामुळे नवजात बालकाला दाखल केलेल्या रुग्णालयात पोहचत त्यांनी अहमद यांची भेट घेऊन रक्तदान करण्याची इच्छा दर्शवली. त्यांनी रक्तदान केल्याने नवजात बालकाला जीवदान मिळाले आहे. आपल्या रक्तदानामुळे एका नवजात बालकाचा जीव वाचल्याचे समाधान असल्याचे ज्ञानचंद यांनी सांगितले.