कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या 70 हजार कर्मचाऱ्यांची झुंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोरोना’ रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असले तरी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी 70 हजार कर्मचारी दिवसरात्र लढा देत आहेत. यामध्ये आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, सुरक्षा आणि वाहतुकीसारख्या अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा अठराशेच्या पार झाला असून बळींची संख्याही शंभरीपार गेली आहे. असे असताना पालिकेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्याबरोबरच मुंबईकरांना नियमित पाणीपुरवठा करणे, स्वच्छता राखणे अशी अत्यावश्यक कामेही करावी लागत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कंपन्या, उद्योगधंदे बंद असताना पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील 70 हजार कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये काम करीत आहेत. यामध्ये पालिकेच्या आरोग्य खात्याकडून तीन हजारांवर डॉक्टरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण देऊन काम करून घेतले जात असल्याची माहितीही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. पालिकेच्या नियमित कर्मचाऱयांबरोबरच अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी, घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करणाऱया साडेतीन हजार ’आशा’ वर्कर्स, ’बेस्ट’च्या वाहतूक आणि इलेक्ट्रिक विभागातील शेकडो कर्मचारी अहोरात्र काम करीत असल्याची माहितीही काकाणी यांनी दिली.

असा साधला जातोय समन्वय
पालिकेचे हजारो कर्मचारी फिल्डवर असताना कोरोनासारख्या गंभीर आजारात समनव्यातून काम करणे गरजेचे आहे. यासाठी विभागवार व्हाट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून समन्वय साधला जात आहे. अतिरिक्त आयुक्त, वॉर्ड अधिकारी आणि संबंधित अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार स्थानिक पातळीवर काम करीत आहेत. राज्य सरकारकडून येणाऱया सूचना आणि निर्देश पाळण्याबाबतही समन्वय साधून काम केले जात आहे. शिवाय पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा, रुग्णसंख्या-स्थितीचा अहवाल वरीष्ठ पातळीवरील अधिकारी राज्य सरकारला देत

कर्मचाऱयांच्या सुरक्षेलाही प्राधान्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱया हजारो कर्मचाऱयांच्या सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेतली जात आहे. सॅनिटायझर, डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांना पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट दिली जात आहेत. -अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी