पालिकेत भाजपचे महापौरांविरोधात ‘अविश्वास’ नाट्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेत महापौरांविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सध्या सभागृह सुरू नाही. त्यात अविश्वास ठराव मांडण्याइतके संख्याबळही पालिकेत नसताना भाजप केवळ प्रसिद्धीसाठी आणि दिखाव्यासाठी हा सगळा खटाटोप करत आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येणारी कामे ही समाधानकारक नसून त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. याबाबत महापौर आम्हाला बोलायला देत नाहीत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अविश्वासाचा ठराव मांडू, असे पालिकेतील भाजप नेत्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपकडे सध्या कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी ते हरतऱ्हेचा प्रयत्न करत आहेत. त्यातीलच हा एक प्रयत्न आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पालिका उत्तम काम करत आहे, मात्र त्याला पाठिंबा देण्याऐवजी आमच्या कामात अडथळा आणण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, असे पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.