पालिकेत भाजपवर पुन्हा नामुष्की, स्थायी समितीत भालचंद्र शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द

पालिकेच्या वैधानिक समित्यांमध्ये झालेला दारुण पराभव आणि प्रभाग समित्यांमध्ये सपाटून मार खाल्लेल्या भाजपवर पालिकेत आज पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. भाजपने स्थायी समितीवर निवड केलेले नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांची निवड कायद्यानुसार नसल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज ही घोषणा केली. सभागृह नेत्या, शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी शिरसाट यांच्या निवडीवर आक्षेप घेत हरकतीचा मुद्दा मांडल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षानेही पाठिंबा दिल्याने शिरसाट यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांत स्थायी समितीची बैठक होऊ शकली नव्हती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने स्थायी समितीची बैठक घेण्यास परवानगी दिल्यानंतर आज ‘कोरोना’ खबरदारी घेऊन बैठक आयोजित करण्यात आली. आजच्या बैठकीत कोरोनासंबंधित व मुंबईकरांशी निगडित अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार होते. दरम्यान, सभा सुरू होताच सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भाजपने शिरसाट यांची स्थायी समिती सदस्यपदी केलेली निवड ही पालिका अधिनियम 1888 नुसार झाली नसल्याचे सांगत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. पालिकेत 227 नगरसेवक मतदार राजांनी निवडून पाठवलेले असतात. तर पाच नामनिर्देशित सदस्यांची निवड ही बेस्ट व शिक्षण समिती सदस्यपदी केली जाऊ शकते. मात्र नामनिर्देशित सदस्याला मतदानात सहभागी होण्याचा अधिकार नसल्यामुळे शिरसाट यांची सदस्यपदी केलेली निवड बेकायदेशीर असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी राऊत यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा दिला.

विरोधकांचाही हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा
– विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा यांनी शिवसेनेच्या विशाखा राऊत यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला पाठिंबा देताना सांगितले की, पालिका अधिनियम 5-1- बी व 43 नुसार महापौरांनी शिरसाट यांच्या सदस्य पदाची घोषणा करताना ते मतदान करू शकतात असे स्पष्ट केले नव्हते. नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांचीच स्थायी समिती सदस्यपदी निवड केली जाऊ शकते. ‘बेस्ट’ समितीत 16 सदस्य असून 15 निवडून आलेले नगरसेवक असतात. फक्त एक नामनिर्देशित सदस्य असतो आणि त्याला मतदानाचा अधिकार असतो, असेही रवी राजा म्हणाले.

न्यायालयात दाद मागणार – भाजप
– याआधी नामनिर्देशित नगरसेवक स्थायी समिती सदस्य असताना कोणीही आक्षेप घेतला नाही. मात्र आता आमचा सदस्य असताना आक्षेप घेऊन शिवसेना सूडाचे राजकारण करीत असून असून मुंबईकरांच्या मूळ प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

भाजपने महापौरांचीही दिशाभूल केली – यशवंत जाधव
– स्थायी समिती सदस्य म्हणून महापौरांकडे शिरसाट यांचे नाव देताना भाजपने ते नामनिर्देशित सदस्य असल्याचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे भाजपने महापौरांचीही दिशाभूल केल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव म्हणाले. याआधी नामनिर्देशित सदस्य स्थायीचे सदस्य असल्याचे भाजप जर सांगत असेल तर त्यांनी त्यावेळी आक्षेप का नाही घेतला, असा सवालही त्यांनी केला. पालिका कायद्यानुसार निवडून आलेले नगरसेवकच ‘स्थायी’चे सदस्य होऊ शकतात. भाजप नाहक राजकारण करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या