
मुंबईच्या पालिका उद्यानात दर्जेदार सुविधांबरोबर आता बेबी फीड कॉर्नर (लहान मुलांसाठी स्तनपान कक्ष) उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर उद्यानामध्ये येणाऱया प्रत्येकाला सुरक्षित वाटावे यासाठी शारीरिक-मानसिकरीत्या सक्षम रखवालदार नेमले जाणार आहेत. रखवालदाराला संपूर्ण गणवेश देणे आवश्यक असून कंत्राटदाराचे नाव, पत्ता, फोन आणि कामाचा कालावधी लिहिलेला फलक उद्यानाबाहेर लावणे बंधनकारक असणार आहे. यात कुचराई करणाऱया कंत्राटदारांवर पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.
मुंबईतील 24 विभागांतील उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळय़ा जागा, रस्ता दुभाजक आणि वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी बुधवारी स्थायी समितीत 24 विभागांतील उद्यानांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. एकूण 106 कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना 43 कोटी 56 लाख 89 हजार 525 रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यावेळी झालेल्या चर्चेत कंत्राटदारांबद्दल तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचला. कंत्राटदाराने नेमलेला रखवालदार हा वृद्ध असतो. त्याला विशिष्ट गणवेश नसतो. त्यामुळे रखवालदार कोणता हे समजत नाही. तो कधीच उद्यानाच्या गेटवर नसतो. तो उद्यानाचे साहित्य ठेवण्याच्या खोलीचा वापर राहत्या घरासारखा करतो, तिथेच झोपतो. त्याला किती पगार मिळतो याची माहिती द्यावी, उद्यानांची योग्य ती निगा घेतली जात नाही, अशा अनेक तक्रारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केल्या. मुंबईतील सर्व उद्यानांच्या रखवालदारांचे वेतन एकत्र केले तर वर्षाला त्याचा आकडा कोटय़वधींच्या घरात जातो. रखवालदारांच्या वेतनावरच इतके पैसे खर्च केले जात असतील तर कंत्राटदार उद्यानांची निगा कशी राखेल? कमी किमतीच्या निविदा काढून कंत्राटे मिळवली जात आहेत, पण त्यामुळे उद्यानांची निगा नीट राखली जात नाही, त्यामुळे उद्यानांबाबत सर्वस्वी कंत्राटदाराला जबाबदार धरले जावे तसेच उद्यानात पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक संजय घाडी यांनी केली. कंत्राटदाराला उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी न देता पूर्वीप्रमाणे उद्याने दत्तक देण्याचे धोरण पुन्हा सुरू करावे, अशी मागणी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. त्यावर सभागृहाने केलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन पालिका उपायुक्त सुरेश काकाणी यांनी दिले.
सुविधा नसल्या तर कंत्राटदारावर कारवाई
नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी कोणत्या उद्यानाची जबाबदारी कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आली आहे याची यादी नगरसेवकांना देण्यात यावी, सर्व कंत्राटदारांनी रखवालदाराला एकसारखा गणवेश द्यावा, त्याचबरोबर कंत्राटदाराला त्याचे नाव, पत्ता, फोन आणि त्याची किती कालावधीसाठी नेमणूक झाली आहे याचा फलक उद्यानात लावणे यासह इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करावे, असे आदेश पालिका प्रशासनाला दिले. त्यावर पालिका प्रशासन कंत्राटदारांसाठी या सगळय़ा गोष्टी बंधनकारक करणार असून महिलांसाठी बेबी फीड कॉर्नर सुरू करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, उद्यानात 24 तास कामाला असलेल्या रखवालदाराला अत्यंत कमी पगार मिळतो अशा तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेऊन किमान वेतन कायद्याचे हे उल्लंघन आहे का याची चौकशी केली जाणार आहे. सुविधा दिल्या नाहीत आणि नियमांचे उल्लंघन झाले तर कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल. तसे प्रतिज्ञापत्र संबंधित कंत्राटदारांकडून घेण्यात येईल. रखवालदारांचे वेतन थेट खात्यात वळते करण्याच्या सूचना कंत्राटदाराला करणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.





























































