
मुंबई सेंट्रल येथील आगीच्या दुर्घटनेनंतर संबंधित सिटी सेंटर मॉलमधील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा दुर्घटनेत मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची गंभीर दखल घेत सर्व मॉलमधील अग्नी सुरक्षेची तपासणी तातडीने करा असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासन व अग्निशमन दलाला दिले. सिटी मॉल आग प्रकरणावरून आज पुन्हा स्थायी समितीत सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरले.
सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्टोबरला लागलेली आग तब्बल 56 तास विझली नव्हती. त्यामुळे आग वारंवार का भडकत होती असा सवाल करीत स्थायी समिती सदस्यांनी पालिका प्रशासनाला गेल्या बैठकीत धारेवर धरले होते. तसेच आगीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर स्थायी समितीने आक्षेप घेत असमाधान व्यक्त केले. विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी प्रशासनाच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत पुन्हा चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी केली. सुमारे 9 महिन्यांआधी अग्निशमन दलाकडून सिटी सेंटर मॉलच्या केलेल्या तपासणीबाबत त्यांनी संशय व्यक्त केला. अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर या गंभीर प्रकरणाची चौकशी करा अशी मागणीही रवि राजा यांनी केली. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सिटी सेंटर मॉल आगीसंदर्भात 15 दिवसांत पुन्हा सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश अग्निशमन दलाला दिले. माझगाव दारूखाना येथील काही पंपन्यांमध्ये अनिधीपृत बांधकामे असून अग्निशमन यंत्रणा नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांची अग्निशमन दलाचे तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही जाधव यांनी प्रशासनाला दिले.
























































