
सामना प्रतिनिधी, मुंबई
पालिका कर्मचाऱ्यांना यंदा 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज याबाबतची घोषणा केली. आर्थिक अडचणींमुळे बोनस देण्यास प्रशासनाने हात आखडता घेतला होता. मात्र महापौर दालनात गटनेत्यांच्या बैठकीत अखेर 15 हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा 500 रुपये वाढीव बोनस मिळणार आहे.
दिवाळीला अवघे काही दिवस उरलेले असल्यामुळे पालिका कर्मचाऱयांचे लक्ष बोनसच्या घोषणेकडे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचाऱयांच्या बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी आज महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या राखी जाधव, भाजपचे गटनेते मनोज कोटक, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमोर महापौरांनी बोनसबाबतची घोषणा केली. त्या वेळी कामगार-कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, महाबळ शेट्टी, दिवाकर दळवी, रमाकांत बने, सत्यवान जावकर, साईनाथ राजाध्यक्ष, बा.शि. साळवी, सुभाष पवार, के.पी. नाईक आदी उपस्थित होते.
दरम्यान, माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या बोनसबाबत या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. वेतनश्रेणीतील कामगार, कर्मचारी, सामाजिक, महिला, आरोग्य स्वयंसेविका, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक यांना त्यांच्या वेतनश्रेणीनुसार बोनसची रक्कम मिळणार आहे.
बोनसची रक्कम कामगार संघटनांना मान्य नाही; दिवाळीनंतर आंदोलनाचा इशारा
दरम्यान, बोनसची रक्कम ठरवताना कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात न घेता ही ठरवलेली ही रक्कम एकतर्फी असून ती आम्हाला मान्य नसल्याची प्रतिक्रिया समन्वय समितीचे बाबा कदम यांनी दिली आहे. महापौरांनी मध्यस्थी घेऊन दिलेला हा बोनस आम्ही स्वीकारत आहोत. मात्र रिक्त पदे, बायोमेट्रीक, असे कर्मचाऱ्यांचे जे अन्य विषय आहेत त्यासंदर्भात दिवाळीनंतर आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना दिला.
शिवसेनेच्या दबावामुळे वाढीव बोनस – महापौर
कामगार संघटनांनी यंदा 40 हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी केली होती. मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी बोनस द्यावा अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली होती. मात्र कामगारांना वाढीव बोनस दिला पाहिजे, अशी भूमिका गटनेत्यांनी बैठकीत मांडली. पालिकेने अनेक विकासकामे, प्रकल्प हाती घेतले अहोत, त्यावर परिणाम होऊ नये आणि कामगारांचे हितदेखील जपले पाहिजे, या हेतूने सुवर्णमध्य काढून हा वाढीव बोनस दिला आहे.
दिवाळीपूर्वी खात्यावर जमा
दरम्यान, बोनसची रक्कम दिवाळीपूर्वी म्हणजेच येत्या दोन दिवसांत कर्मचाऱयांच्या खात्यावर जमा होणार आहे. पालिकेचे एक लाख कर्मचारी असून सानुग्रह अनुदानापोटी पालिकेच्या तिजोरीवर अंदाजे दीडशे कोटींचा बोजा पडणार आहे.
summary- bmc employee will get 15 thousand bonus

























































