
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱया मुंबई महापालिका कर्मचाऱयांना आता दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळणार आहेत. त्याबाबतचा निर्णय राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून प्रशासनाने त्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. शिवसेना आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. या निर्णयाचा पालिकेतील जवळपास 1 हजार 498 कर्मचाऱयांना लाभ होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, त्याचप्रमाणे पालिकेचा व्यवहार सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी भाषा विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱया महापालिका कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केलेला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी 2015 पासून पुढे बंद होती. त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढीपासून वंचित होते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी 2016 ते 2018 पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱयांनादेखील मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यांनी याबाबत निर्देशित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेत मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा महानगरपालिकेतील जवळपास 1 हजार 489 पालिका कर्मचाऱयांना होणार असून पालिकेच्या तिजोरीवर 52 लाख 63 हजार रुपयांचा भार पडणार आहे.
शिवसेना मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि वाढीसाठी कटिबद्ध
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याच्या विषयावर गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाची तपासणी करून आठ दिवसांत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. तसेच पुढील तीन महिन्यांत याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी आमदार प्रभू यांना आश्वस्त केले होते. आज याबाबतचे परिपत्रक काढून शिवसेना मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मायमराठीसाठी केलेल्या ठरावाची, अंमलबजावणी करायलाच हवी
या निर्णयामुळे मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱया कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार आहेत. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता कर्मचाऱयांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला असून, काम आणि घरच्या जबाबदाऱया सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे मायमराठीसाठी महापालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी, अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱयांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबतचा ठराव करून पालिकेने तो नगरविकास विभागाकडे पाठवला होता. त्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने पालिकेतील अनेक कर्मचाऱयांना लाभ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार! – सुनील प्रभू, आमदार

























































