पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । प्रतिनिधी

हिमालय पूल दुर्घटना प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी मंगळवारी अटक केलेल्या कार्यकारी अभियंता अनिल पाटील याला कोर्टाने बुधवारी 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पाटील याचा सहकारी व सहाय्यक अभियंता संदीप काकुळते यालादेखील कोर्टाने 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

हिमालय पूल कोसळण्याला पालिकेच्या ब्रिज विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील आणि सहाय्यक अभियंता संदीप काकुळते यांचा बेजाबदारपणा कारणीभूत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी सोमवारी संदीप काकुळतेला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी संदीपचा वरिष्ठ अनिल पाटीलला अटक करण्यात आली. या दोघांनाही कोर्टाने 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलीस पालिकेच्या आणखी अधिकाऱ्यांची चौकशी करणार असून जो दोषी आढळेल त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.