पालिकेच्या अभियंत्याकडून सलून मालकाकडे दोन लाख लाचेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

सामना ऑनलाईन । मुंबई

पालिकेच्या के पश्चिम विभागाकडून अंधेरी येथील एका सलूनला अनधिकृत बांधकाम सुरू असल्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. हे प्रकरण मिटविण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याने सलूनवाल्याकडे दोन लाखांची लाच मागितल्याचे समोर आल्याने याप्रकरणी ऍण्टी करप्शन ब्युरोने तो अभियंता व त्याच्या अन्य सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दीपक हा काम करीत असलेल्या सलूनमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असून ते बंद करण्याबाबत पालिकेच्या के पश्चिम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे या नोटिसीच्या अनुषंगाने सलून मालकाने दीपकला संबंधित अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले होते. त्यानुसार दीपक हा अमोल जाधव या कनिष्ठ अभियंत्याला भेटला. तेव्हा हे प्रकरण मिटविण्यासाठी तीन लाखांची मागणी जाधव यांनी केली. तडजोडीअंती दोन लाखांवर सौदा पटला. मात्र लाच द्यायची नसल्याने दीपकने ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. त्यानुसार चौकशीत जाधव यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ऍण्टी करप्शन ब्युरोमध्ये अमोल जाधव तसेच दुय्यम अभियंता आनंद नेरूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.