
महापालिकेची सर्व उद्याने, मैदाने आता सोमवार ते शुक्रवार पहाटे 5 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजेच दिवसभरात तब्बल 15 तास खुली राहणार आहेत. तर शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सद्यस्थितीत पालिकेची उद्याने सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत खुली असतात.
मुंबईकरांच्या उत्तम आरोग्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दर्जेदार उद्याने, मैदानांची संख्या वाढवण्यात येत आहेत. ही खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा, या मैदाने-उद्यानांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा यासाठी वेळेत वाढ करण्यात आली आल्याचे पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले.
अशी आहेत पालिकेची उद्याने
महापालिका क्षेत्रात एकूण 229 उद्याने, 432 मनोरंजन मैदाने, 318 खेळाची मैदाने, 26 पार्क आहेत. या सर्व ठिकाणचा वेळ वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
विशिष्ट उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदान खुली ठेवण्याच्या वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त न्याय्य कारणास्तव संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करू शकतील.





























































