झीरो प्रिस्क्रिप्शन योजनेत महापालिका रुग्णालयांत पाच हजार वैद्यकीय वस्तू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका रुग्णालयांत लवकरच झीरो प्रिक्रिप्शन मोहीम राबवण्यात येणार असून या उपक्रमात विविध प्रकारच्या औषध-गोळ्यांसह इंजेक्शन, सलाईन, हँड ग्लोव्हज्सह विविध प्रकारच्या तब्बल पाच हजार वस्तू रुग्णालयांत उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा मोफत मिळणार असून बाहेरून औषधे आणण्याचा भुर्दंड पडणार नाही. अशी सुविधा देणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात मिळणाऱया मोफत आणि अद्ययावत सुविधांमुळे केवळ मुंबईच नक्हे, राज्य-देशाच्या कानाकोपऱयातून शेकडो रुग्ण दररोज उपचारांसाठी येत असतात. यामध्ये केईएम, शीव, नायर आणि कूपर या मोठय़ा रुग्णालयांत दररोज मोठी गर्दी असते. त्यामुळे पालिका आपल्या 16 उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार आणि काही रुग्णालये नव्याने बांधून सुरू करीत आहे. यामध्ये 2024 मध्ये चार नवी रुग्णालये अद्ययावत सुविधांसह सुरू केली जाणार आहेत, तर या सर्व रुग्णालयांमध्ये ‘झीरो’ प्रिक्रिप्शन मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात येणाऱया गोरगरीब रुग्णांना बाहेरून कोणतीही औषधे खरेदी करावी लागणार नाहीत.

अशी आहे पालिकेची आरोग्य व्यवस्था

प्राथमिक आरोग्य सेवेंतर्गत पालिकेची 211 आरोग्य केंद्रे, 189 दवाखाने, 27 प्रसूतिगृहे, 16 उपनगरीय रुग्णालये, 5 विशेष रुग्णालये आणि तृतीयस्तरीय आरोग्य सेवेंतर्गत 4 वैद्यकीय महाविद्यालये, 5 रुग्णालये, 1 दंत महाविद्यालय आहे. या सर्व ठिकाणी मोफत सुविधा मिळत असल्या तरी अनेक वेळा बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. हे टाळण्यासाठी ‘झीरो प्रिस्क्रिप्शन’ मोहीम राबवण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या परवानगीने आणि सर्व नियम पाळूनच या वस्तू खरेदीसाठीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही योजना लवकरात लवकर लागू करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. – डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त