
पालिका मुख्यालयात स्थापत्य समितीची बैठक सुरू असताना बुधवारी काच पडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन पालिका मुख्यालयाच्या इमारतीचे मेंटेनन्स ऑडिट करा अशी मागणी स्थायी समितीत शिवसेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी केली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱयांची दालने चकाचक असतात पण लोकप्रतिनिधींची दालने सुस्थितीत नाहीत असा आरोप करत सर्वपक्षीयांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले.
स्थापत्य समितीच्या बैठकीवेळी भिंतीवरील पार्टिशनची काच पडली. यात स्थापत्य समितीच्या अध्यक्षा प्रीती पाटणकर आणि काही पालिका अधिकारी थोडक्यात बचावले. याची गंभीर दखल आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आली. याबाबत हरकतीचा मुद्दा सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. इमारतीमध्ये अनेक त्रुटी आहेत. लोकप्रतिनिधींना देण्यात येणाऱया काही खुर्च्या तुटक्या असतात. काही वेळा स्थायी समितीच्या सभागृहाबाहेरील आवारात जेवताना एसीचे पाणी गळत असते. मात्र पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱयांची दालने चकाचक आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयांमध्ये असा भेदभाव का, असा प्रश्न करत या हेरिटेज वास्तूचे मेंटेनन्स ऑडिट केले जावे अशी मागणी केली. यावेळी मेंटेनन्स विभागाच्या अधिकाऱयावर सर्वपक्षीयांनी प्रश्नांचा भडिमार केला. ही काच मोठी असती आणि त्यात कोणी गंभीर जखमी झाले असते तर त्याची जबाबदारी पालिका प्रशासनाने घेतली असती का, असा प्रश्न नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी केला.
बैठकीला हेल्मेट घालून बसावे लागेल!
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही इमारतीच्या अंतर्गत देखभालीबद्दल चिंता व्यक्त केली. ‘काल काच पडली पण आता मला डोक्यावरच्या झुंबराचीही भीती वाटू लागली आहे. उद्या सभागृहात येताना आणि स्थायी समितीच्या बैठकीला मला हेल्मेट घालून बसावे लागेल’ असा टोला यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासन आणि मेंटेनन्स विभागाच्या अधिकाऱयाला लगावला. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे सांगत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.


























































