
मुंबईत आगीच्या दुर्घटनांमुळे होणारी जीवित-वित्तहानी रोखण्यासाठी पालिका जोमाने कामाला लागली असून बेकायदेशीर कामांविरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. यामध्ये बोरिवली पश्चिम येथील श्रद्धा हायईट्स सोसायटीच्या कमिटी मेम्बरनी सोसायटीत मनमानीपणे बेकायदेशीर काम केल्याची तक्रार करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने संबंधित सोसायटीला तपासणीसाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे सोसायटीमधील अनियमिततेवर कारवाई होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे तक्रारदार जसुभाई वाघानी यांनी सांगितले.
बोरिवलीच्या एक्सर रोड बाभई नाका येथे तीन वर्षांपूर्वी ही 21 माळ्यांची बिल्डिंग बांधण्यात आली आहे. मात्र संबंधित कमिटी मेंबर्सनी सोसायटीत बेकायदेशीरपणे काम केल्याचा आरोप वाघानी यांनी केला असून पालिकेच्या आर/मध्य विभागाकडे तक्रार केली आहे. कमिटी मेंबर्सनी मनमानीपणे पहिल्या मजल्यावर पार्ंकगच्या जागी बेकायदेशीरपणे कमिटीचे ऑफिस थाटले असून इलेक्ट्रिक केबिनजवळ स्टोरेज बनवले आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीत धोकादायक ठरणारी मागच्या बाजूला बांधलेली संरक्षक भिंत हटवण्याचे आदेश पालिकेच्या अग्निशमन दलाने देऊनही ही भिंत हटवण्यात आली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार जसुभाई वाघानी यांनी केली होती.

























































