कनिष्ठ अभियंत्यांची पदे पुढील आदेशापर्यंत भरू नका! हायकोर्टाचे पालिकेवर ताशेरे

216

कामात बढती मिळूनही सफाई कर्मचाऱ्याची अभियंता पदावर तीन वर्षांपासून नियुक्ती करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाने धारेवर धरले. कनिष्ठ अभियंता पदे भरण्याचा तुमचा निकष काय, 16 पैकी 15 जणांची निवड करून केवळ याचिकाकर्त्याला या पदापासून दूर का ठेवले, असा सवाल हायकोर्टाने केला. पुढील आदेशापर्यंत कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरू नका असा आदेश पालिका प्रशासनाला दिला.

पालिकेच्या सांडपाणी आणि मलनिःसारण विभागात रुजू झाल्यानंतर दीपक सावंत यांनी अभियंता पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. अभियंता म्हणून त्यांना बढतीही देण्यात आली, परंतु नियुक्ती करण्यास तीन वर्षे त्यांना पालिकेने झुलवत ठेवले. त्यामुळे दाद मागण्यासाठी सावंत यांच्या वतीने ऍड. जोएल कार्लोस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यासंदर्भात वेळोवेळी त्यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क केला, परंतु पदे रिक्त नसल्याची सबब सांगण्यात आली. दरम्यान, पालिकेने दोन वेळा कनिष्ठ अभियंत्याची पदे भरण्यासाठी  परिपत्रक काढले याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले व याप्रकरणी जाब विचारत सुनावणी 12 डिसेंबरपर्यंत तहकूब ठेवली.

आपली प्रतिक्रिया द्या