माहुलवासीयांची मृत्यूच्या दाढेतून सुटका!

जिवघेण्या प्रदूषणाने वेढलेल्या माहुलवासीयांची लवकरच मृत्यूच्या दाढेतून सुटका होणार आहे. सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या 300 घरांमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. महिनाअखेरपर्यंत ही घरे महापालिकेकडे हस्तांतरीत केली जाणार असून त्यानंतर माहुलवासीयांना 1 फेब्रुवारीला त्या घरांचा ताबा देण्यात येणार आहे. ताबा प्रमाणपत्रांसह ही घरे हस्तांतरीत केली जाणार आहेत.

माहुल हे विविध रासायनिक कंपन्या आणि प्रकल्पांनी वेढलेले आहे. त्यातून होणाऱया प्रदूषणामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. जे बचावले आहेत त्यातील अनेकांना श्वसन आणि त्वचाविकारांसारख्या व्याधींनी ग्रासले आहे. लहान मुलांना तर अधिकच त्रास होत आहे. या नरकातून आमची सुटका करण्यासाठी हजारो माहुलवासीयांचा सरकारदरबारी आणि न्यायालयात लढा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

माहुलवासीयांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बैठक झाली. म्हाडाकडे सध्या मुंबईत 300 घरे उपलब्ध आहेत. ती घरे माहुलवासीयांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. उर्वरीत घरांचेही पुनर्वसन करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱयांना देण्यात आल्या, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.

  • तानसा जलवाहिनी आणि अन्य प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन काही वर्षांपूर्वी माहुलमध्ये करण्यात आले. माहुलच्या वसाहतीमध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. प्रदूषणामुळे तेथील नागरिकांना विविध आजार जडले. त्यात शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. या नागरिकांना अन्यत्र राहण्यासाठी दरमहा 15 हजार रुपये भाडे द्यावे किंवा त्यांचे माहुलबाहेर पुनर्वसन करावे, असे न्यायालयाचे आदेश आहेत.

…ही पावलेही उचलणार

  • प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर लवकरच बैठक.
  • माहुलमधील कंपन्या पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने निकष पाळतात की नाहीत याची पडताळणी.
  • उद्योगांकडून सांडपाणी व्यवस्थापन.
  • ग्रीन झोनची निर्मिती.
  • हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना.

हा आमच्यासाठी सुवर्णदिन

आज आमच्या ‘जीवन बचाओ’ आंदोलनाला 455 दिवस झाले. आज सुवर्णदिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार. उर्वरित 5200 कुटुंबीयांनाही घरे मिळतील अशी आशा आहे. – बिलाल खान

शिवसेनेने करून दाखवले

आदित्य ठाकरे यांनी जे बोलले ते करून दाखवले. आता लवकरात लवकर आम्हाला घरे मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आमचे जीव तरी वाचतील. – अनिता ढोले

आपली प्रतिक्रिया द्या