मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार! 22 नोव्हेंबरला निवडणूक

1347
bmc-2

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व असलेल्या आणि पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचा उमेदवार यावेळीही महापौरपदी विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 नोव्हेंबर रोजी होणाऱया या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पालिका चिटणीस खात्याकडे अर्ज सादर करता येणार आहे.

राज्यातील 27 महानगरपालिकांमधील महापौरपदाची पहिल्या अडीच वर्षांची मुदत 21 नोव्हेंबरला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार, 13 नोव्हेंबर रोजी मंत्रालयातून राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी सलग दुसऱ्या वेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले. त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी पालिकेच्या सर्व 222 नगरसेवकांना अर्ज करण्याची संधी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठी कोणकोणत्या पक्षाकडून अर्ज सादर केले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

म्हणूनच शिवसेनेचा विजय निश्चित

एकूण 222 नगरसेवक असलेल्या पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 94 नगरसेवक आहेत तर भाजपचे 83 नगरसेवक आहेत, मात्र 2017 च्या निवडणुकीत महापौरपदासह कोणत्याही समितीसाठी भाजपने अर्ज सादर केला नाही. यातच यावेळीही अर्ज सादर करण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असताना भाजपकडून महापौरपद उमेदवारीसंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही, तर पालिकेत काँग्रेसचे 29, राष्ट्रवादीचे 8, ‘सपा’चे 6, ‘मनसे’ 1 आणि ‘एमआयएम’चे 2 असे संख्याबळ आहे. त्यामुळे इतर पक्षांचे संख्याबळ पाहता शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या