नोकरदार महिलांना मिळणार गोरेगावमध्ये पालिकेचा ‘निवारा’! शेकडो महिलांची गैरसोय दूर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबईत काम करणाऱ्या नोकरदार महिलांसाठी पालिका गोरेगावमध्ये लवकरच हक्काचा ‘निवारा’ सुरू करणार आहे. यासाठी पालिका 16 मजली प्रशस्त इमारत बांधणार आहे. यामुळे मुंबईत कामासाठी येणाऱ्या शेकडो महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

मुंबईत दररोज शेकडो किलोमीटर लांबून हजारो महिला कामानिमित्त येत असतात. ‘महागडय़ा’ मुंबईत त्यांना राहण्यासाठी घर घेणे परवडत नाही. शिवाय भाडय़ाने घर घेणेदेखील परवडणारे नसते. त्यामुळे हजारो महिलांना मुंबईबाहेर राहून दररोज कामाच्या ठिकाणी येणे अपरिहार्य ठरते.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विकास आराखडय़ात नोकरदार महिलांसाठी पी दक्षिण विभागात न.भू.का.क्र. 900/ए/3, पहाडी गाव, गोरेगाव पश्चिम येथे तळमजला अधिक 16 मजल्यांची बहुउद्देशीय गृहनिर्माण इमारत, घनकचरा व्यवस्थापन व काळजी केंद्रासाठी भूखंड आरक्षित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रस्तावित असणाऱया इमारत बांधणीचा प्रस्ताव पालिकेच्या आगामी महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

असे होणार काम
तळघर ते 16 मजल्यांच्या इमारतीत तळघरात 14 चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ
तळमजल्यावर प्रवेश लघुमार्ग, प्रशासक व काळजीवाहक खोली शिशुगृह
पहिल्या मजल्यावर पाळणाघर, लघुमार्ग, वाणिज्यिक क्षेत्र तर तिसऱ्या मजल्यावर सेवा मजला
चौथा ते सहावा, आठवा ते तेरावा, पंधरावा ते सोळाव्या मजल्यावर लघुमार्ग, प्रत्येक मजल्यावर सहा खोल्या
15 बेडसह सातवा व चौदाव्या मजल्यावर आश्रयस्थान, लघुमार्ग, प्रत्येक मजल्यावर चार खोल्या आठ बेडसह
सुरक्षेसाठी इमारतील सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा यंत्रणा आदी यंत्रणा