कोरोना काळातही पोलिओविरोधात जोरदार मोहीम, 5 लाख 12 हजार 860 बालकांना दिली लस

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिकेने जोरदार मोहीम उघडून कोरोनाला नियंत्रणात आणल्यानंतर आता पोलिओविरोधातही मोहीम उघडली आहे. मुंबईत रविवारी राबवलेल्या पोलिओ मोहिमेत 5 लाख 12 हजार 860 बालकांना लस देण्यात आली. यावेळी मुंबईत 4 हजार 797 बुथ उभारण्यात आले. ज्यांना लस देण्यात आली नसेल अशा बालकांसाठी शुक्रवार, 25 सप्टेंबरपर्यंत घराघरात जाऊन लस देण्यात येणार आहे.

कोरोनाला रोखण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलत असताना मुंबई महानगरपालिका पावसाळ्यात मुंबईत उद्भवणार्‍या डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यासह इतर साथीच्या आजारांविरोधातही जोरदार मोहीम राबवत आहे. हिंदुस्थान 2014मध्ये पोलिओमुक्त झाला असूनही पोलिओ होऊ नये, यासाठी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’ देशभरात सुरू आहे. मुंबईतील रविवारच्या मोहिमेत महापालिका कर्मचारी, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका/मदतनीस, शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मिळून 13 हजार 992 जणांनी सहभाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या