ऑगस्ट क्रांती मैदान कात टाकणार पालिका करणार सात कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ाचे साक्षीदार असलेले ग्रॅण्ट रोड विभागातील ऑगस्ट क्रांती मैदान धगधगत्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास जागवणार आहे. पालिकेच्या माध्यमातून मैदानाचे सुशोभीकरण-दुरुस्ती करून मैदानाला मूळ रूप देण्यात येणार आहे. शिवाय या ठिकाणी स्वातंत्र्यलढय़ाची आठवण दर्शवणारे आकर्षक भित्तिचित्र तयार करण्यात येणार असून ‘ऑगस्ट क्रांती’त सहभागी क्रांतिकारकांची नावेही दर्शवली जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. या कामासाठी पालिका सात कोटींचा खर्च करणार आहे.

उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

ऑगस्ट क्रांती मैदानाला स्वातंत्र्यलढय़ाचा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे महत्त्वाच्या सुशोभीकरणाच्या कामात राज्य सरकारशीही विचारविनिमय केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिका अधिकाऱयांची निर्णायक बैठक नुकतीच झाली. पुढील आठवडय़ात या कामाचा शुभारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे होणार सुशोभीकरणाचे काम

– ऑगस्ट क्रांती मैदानाच्या सुशोभीकरणात 1942 प्रमाणे मूळ स्वरूप देण्यात येणार आहे. मैदानावर हिरवळ करण्यात येईल.
– मैदानावर साडेपाचशे मीटरचे चालण्यासाठी पदपथ बनवण्यात येईल. साडेपाचशे मुलांचे मैदान, नाना-नाना पार्क आहे त्याच स्थितीत ठेवले जाणार आहे. मैदानाभोवतीचे बेकायदा बांधकाम हटवण्यात येईल. या ठिकाणची ‘बेस्ट’ची चौकी, स्वच्छतागृहदेखील हटवण्यात येईल.
– मैदानासभोवतीची भिंत काढून संपूर्ण मैदानाला ‘ओव्हल’ मैदानाच्या धर्तीवर आरपार नजारा दिसणारी ग्रीलचे पुंपण बसविण्यात येणार आहे.
– मैदानाचा दर्जा राखण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या, दिवाबत्ती, कचरा नियोजनाचे कामही केले जाणार आहे.