
प्रतिबंधित प्लॅस्टिक विक्री करणाऱयांवर मुंबई महापालिकेची गेल्या आठ महिन्यांपासून कठोर कारवाई जोरात सुरू असून 884 जणांवर कारवाई करत 4 हजार 120 किलोचे प्लॅस्टिक जप्त केले आहे. त्यांच्याकडून 44 लाख 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून 22 फेरीवाल्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
मुंबईत 26 जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुराला प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, प्रतिबंधित प्लॅस्टिक विक्री व वापर करणाऱयांवर कारवाई करण्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मात्र, मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर प्रतिबंधित प्लॅस्टिक पिशव्या विक्री करणाऱयांवर कारवाई थंडावली. परंतु कोरोना नियंत्रणात आल्यानंतर 1 जुलै 2022 पासून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने आतापर्यंत आठ महिन्यांत 1 जुलै 2022 ते 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत 884 ठिकाणी कारवाई केली असून त्यांच्याकडून 4 हजार 120 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले, तर 44 लाख 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, 22 जणांवर कठोर कारवाई करत त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे.
23 पथकांकडून कारवाई
प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधी मोहीम कठोरपणे राबवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने परवाना विभाग, बाजार आणि दुकाने व आस्थापना विभाग यातील 250 अधिकाऱयांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, तर 23 पथके तयार केली असून त्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.





























































