पालिकेची सॅप प्रणाली अद्ययावत कामांसाठी  26 नोव्हेंबरपर्यंत सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पालिकेकडून उपयोगात येणाऱ्या ‘सॅप’ संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम  13 नोव्हेंबरपासून सुरू केले असून 26 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सॅप प्रणाली अद्ययावत करण्यासह त्यात नवीन वैशिष्टय़ांचा समावेश करण्यासाठी 13 ते 23 नोव्हेंबरपर्यंत सॅप प्रणाली बंद राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. तथापि, काही अपरिहार्य तांत्रिक बाबींमुळे अद्ययावत करण्याच्या कामांमध्ये अधिक कालावधी हवा असल्याने ही मुदत आता 26 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे ही सॅप प्रणाली 26 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या सॅप प्रणालीव्यतिरिक्त इतर सेवा या नेहमीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. मालमत्ता कराचा भरण्यासाठी https://ptaxportal.mcgm.gov.in, जलदेयकांचा भरणा करण्यासाठी https://aquaptax.mcgm.gov.in तसेच ऑनलाईन इमारत बांधकाम परवानगीच्या अर्जाकरिता https://autodcr.mcgm.gov.in या वेबसाईट्स कार्यान्वित राहणार असून मुंबईकरांची  गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. ही अद्ययावत, वैशिष्टय़पूर्ण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी, सध्या कार्यान्वित असलेल्या सॅप प्रणालीचे सर्व्हर्स बंद करुन त्याचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. असे केल्याने सॅप प्रणालीमध्ये आतापर्यंत झालेल्या व्यवहारांची सुसंगता राखली जाईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.