‘मिठी’ खबर… स्विडनची कंपनी मिठीचे पाणी शुद्ध करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या काही वर्षांपासून घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेल्या मिठी नदीचे पाणी स्विडनची कंपनी शुद्ध करणार आहे. यात नदीचे पाणी शुद्ध करून नदीला गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. चार टप्प्यांत हे काम केले जाणार असून यासाठी पालिका 21.90 कोटी रुपये खर्च करणार आहे.

मिठी नदीच्या प्रदूषणाचा भार दिवसेंदिवस वाढत जात असून रहिवाशी व औद्योगिक कंपन्या, विविध नाल्यांमधून जवळपास दशलक्ष लिटर सांडपाणी नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पात्राचे रुंदीकरण करण्यात आल्यानंतर प्रदूषित नदीचे पाणी शुद्ध करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टी होऊन आलेल्या पुराला मिठी नदीदेखील कारणीभूत ठरल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱया चार टप्प्यांतील कामात मिठी नदीमध्ये येणारा मलप्रवाह वळविण्यासाठी नदीलगत प्रवाहरोधक बांधणे, मलवाहिन्या टाकणे, मलजल उदंचन केंद्र व मल प्रक्रिया केंद्र उभारणे, मिठी नदी सर्व्हिस रोड बांधणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत. या चारही टप्प्यांच्या कामांचे प्रकल्प व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सल्लागाराची नेमणूक केली आहे. स्विडनमध्ये ज्या कंपनीच्या देखरेखाली मलमिश्रित पाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले त्याच स्विडन कंपनीच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आय.व्ही.एल. स्विडीश एन्व्हायरन्मेंटल रिसर्च इन्स्टिटय़ूट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी 21.90 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

चार टप्प्यांत होणार सुधारणा

टप्पा – 1 फिल्टरपाडा ते पवई जल विभाग यार्डापर्यंत 2 कि.मी.ची लांबी, टप्पा – 2: पवई जल किभाग यार्ड ते सी.एस.टी. पूल, कुर्ला, टप्पा – 3: भरती प्रवण क्षेत्रातील नदीची लांबी, टप्पा – 4 : बापट नाला ते नकीन घाटकोपर केंद्रापर्यंत मलजल बोगद्याचे बांधकाम.