ओमायक्रोनला रोखण्यासाठी पालिकेचे वॉर्ड वॉररूम सज्ज! होमक्वारंटाइन प्रवाशांना दिवसातून 5 वेळा कॉल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये आलेल्या घातक ओमायक्रोनविरोधात लढण्यासाठी पालिकेचे वॉर्ड वॉररूम पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांचा कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी सात दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यांच्यावर पालिकेच्या वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल. यामध्ये दिवसाला पाच पह्न कॉल करण्यात येणार असून पालिकेचे पथक ‘सरप्राइज व्हिजिट’ देऊन तपासणीही करणार आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज निर्देश जारी केले आहेत.

युरोपीय देशांमध्ये आलेल्या कोरोनाच्या ओमायक्रोनमुळे पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शिवाय परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक केले आहे. यामध्ये ‘हायरिस्क‘ देश आणि ‘अॅटरिस्क’ देश अशी विभागणी करण्यात आली आहे. ‘हायरिस्क’ देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, बोस्वाना व झिम्बाबेचा समावेश असून या देशांतून आलेल्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी त्यांना सात दिवस क्वारंटाइन केले जात आहे. आतापर्यंत 17 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर इतर देशांमधून आलेल्यांना होम क्वारंटाइनची सक्ती आहे. होम क्वारंटाइन कठोरपणे पाळले जावे यासाठी पालिका आयुक्त चहल यांनी आज वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातून काम करण्याचे निर्देश दिले.

सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम

हायरिस्क आणि अॅटरिस्क अशा दोन प्रकारांत प्रवाशांची वर्गवारी करून नोंद केली जाणार आहे. रोज सकाळी 9 वाजता या श्रेणीनुसार प्रवाशांची माहिती विमानतळ प्रशासनाने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवावी. शिवाय मागील 15 दिवसांतील प्रवाशांची यादीही पाठवावी.

ही माहिती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाने रोज सकाळी 10 वाजता प्रत्येक प्रभागातील प्रवाशांच्या नावासह प्रभागातील वॉररूमला आणि आरोग्य विभागाला पाठवावी.

या प्रवाशांची माहिती त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीतील जबाबदार व्यक्तीलाही द्यावी.या व्यक्तीने प्रवास करून आलेली व्यक्ती गृह विलगीकरणाचे नियम पाळत आहे का नाही यावर लक्ष ठेवावे.

नजर, समुपदेशन आणि कारवाई

  • वॉर्ड वॉररूमच्या माध्यमातून होम क्वारंटाइनवर नजर ठेवली जाईल. त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसेल.
  • गरज भासल्यास उपचार करता यावेत यासाठी प्रत्येक वॉर्ड वॉररूम अंतर्गत दहा अॅम्ब्युलंस तैनात असतील.
  • नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून पालिकेच्या क्वारंटाइनमध्ये रवानगी केली जाईल.
  • सातव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होईल याचीही खबरदारी घेतली जाईल.