
सामना ऑनलाईन । मुंबई
जुहूतील संत ज्ञानेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची काही जागा पालिकेला घ्यावी लागणार आहे. यासाठी अमिताभ बच्चन यांनी जागा देण्याची तयारी याआधीच दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामासाठी पालिकेने बच्चन यांना एका महिन्यात संरक्षक भिंत तोडून आवश्यक असणारी जागा देण्यास सांगितले आहे.
जुहू येथील ईस्ट-वेस्ट मार्ग म्हणजेच संत ज्ञानेश्वर मार्ग रुंदीकरणासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेरील 8 ते 10 फूट जागा पालिकेकडून ताब्यात घेतली जाणार आहे.
बदल्यात ‘एफएसआय’चा लाभ मिळणार
अमिताभ बच्चन यांनी प्रतीक्षा बंगला बांधला तेव्हा पालिकेकडून कोणताही लाभ घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या आवारातील जागा घ्यायची असल्यास त्यांना एफएसआयचा लाभ द्यावा लागेल, त्यासाठी पालिका त्यांना लेखी विनंती करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
वाहतूककोंडी फुटणार
संत ज्ञानेश्वर मार्गावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेने 45 फुटांच्या या मार्गाचे 60 फुटांपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन काम सुरू केले आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याची काही जागा घ्यावी लागणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे या भागातील वाहतूककोंडी फुटणार आहे.



























































