
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेत अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ 70 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवा देत आहेत. मात्र, ही सेवा देताना काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर काहींचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, जे कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांना हे विमा कवच मिळणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.


























































