बोइंग विमानाच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचा रहस्यमय मृत्यू, सॅम सालेहपूर यांनी आधीच केले होते सावध

अहमदाबाद दुर्घटनेनंतर बोइंग विमानांबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत.  बोइंगच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही विमाने बनवण्यात खूपच घाई केल्याचे सांगितले होते. तसेच नियमांना पायदळी तुडवत ही विमाने तयार केली असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता, मात्र काही दिवसांनी या कर्मचाऱ्याचा रहस्यमय मृत्यू झाला होता.

2011 मध्ये एअर इंडियाने बोइंग 787 ड्रीमलायनर हे विमान आपल्या ताफ्यात सामील केले होते. ड्रीमलायनर विमानात इंजिन, गिअर, फ्लॅप, केबिन प्रेशरमध्ये कमी आणि जास्त उंची संबंधित समस्या समोर आल्या आहेत. 2015 ते 2024 दरम्यान एअर इंडियाच्या 787 ड्रीमलायनरमध्ये अनेक समस्या आढळून आल्या. याच्याशी निगडीत सुमारे 32 घटना घडल्या.

इंजिनीअरने उघड केलं सत्य

2024 मध्ये बोइंग अभियंता सॅम सालेहपूर यांनी या विमानाच्या संरचनेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. बोइंगने विमान बनवताना काही शॉर्टकट घेतले होते. 787 ड्रीमलायनर विमानाच्या फ्युजलेजचे काही भाग चुकीच्या पद्धतीने एकत्र केले गेले होते. हजारो उड्डाणांनंतर ते हवेतच तुटू शकतात, असे सॅमने म्हटले होते.

बोइंग कर्मचाऱ्याचा दावा फेटाळला

बोइंगचे माजी कर्मचारी जॉन बार्नेट यांचा 2017 मध्ये रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला होता. बोइंग कंपनीविरुद्ध साक्ष देणारे एकमेव कर्मचारी होते. बार्नेट यांनी 30 वर्षे बोइंगमध्ये काम केले. बार्नेट यांच्या मते 787 ड्रीमलायनरच्या रचनेत बोइंगने निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरले आहेत. बोइंग कंपनीने बार्नेट यांचे सर्व दावे फेटाळून लावले. बार्नेट यांनी बोइंग व्यवस्थापकांसमोर सर्व मुद्दे उपस्थित केले. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या 2017 च्या पुनरावलोकनात बार्नेटच्या काही निरीक्षणांची खात्री करून घेण्यात आली. परिणामी, बोइंगला सुधारात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. 2024 मध्ये रहस्यमयरीत्या त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी बोइंगसंबंधित मानसिक आघाताचा उल्लेख करून कंपनीविरोधात खटला दाखल केला.