कंगनाला चौकशीसाठी कधी बोलवणार? काँग्रेसचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यांत कलाकार तसेच त्यांच्याशी संबंधित अनेकांची चौकशी केली. मात्र स्वतः ड्रगचे सेवन करणारी आणि दुसऱयांना जबरदस्तीने ड्रग घेण्यास भाग पाडणाऱया कंगना राणावतला मात्र आजपर्यंत एनसीबीने चौकशीला बोलावले नाही. त्यामुळे कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी एनसीबीला केला.

स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देणारा कंगनाचा एक व्हीडिओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झालेला आहे. तिचा एक मित्र अद्ययन सुमन यानेही कंगना ड्रग घेण्यास भाग पाडत असल्याचा व्हिडिओ जाहीर केला आहे. बॉलिवूडमधील ड्रग संदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ असेही कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. असे असताना एनसीबी त्याकडे गांभीर्याने का पहात नाही? असा प्रश्न सावंत यांनी केला आहे. कंगनाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोक याविषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. त्यामुळे राम कदम यांनी कंगनाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावे. या संपूर्ण प्रकरणात भाजपने कंगनाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करणाऱया भाजपने महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.