नव्या वर्षात मनोरंजनाचा धमाका, बॉलिवूडची भिस्त रिमेकवर तर जुन्या-नव्या नाटकांची रसिकांना पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे कधी नव्हे ती मनोरंजनसृष्टी आठ महिने ठप्प झाली. अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू चित्रपट, नाटय़सृष्टीची गाडी रुळावर येतेय. नवीन वर्षात मनोरंजनाचा नवा धमाका करण्यासाठी बॉलीवूडची भिस्त रिमेक आणि बिग बजेटवर तर मराठी चित्रपटांची भिस्त नव्या आशयांच्या चित्रपटांवर असणार आहे. याशिवाय वर्षभरात नव्या–जुन्या नाटकांची पर्वणीही रसिकांना मिळणार आहे.

बिग बजेट सिनेमे करणार ’पैसा वसूल’

गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेक बिग बजेट चित्रपट रखडले होते. यंदाच्या वर्षी बिग बजेट चित्रपटांच्या अक्षरशः रांगा लागणार आहेत. रणवीर सिंगचा ‘83’ आणि ‘सर्पस’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज’, ‘बेलबॉटम’, ‘रक्षाबंधन’, शाहरूख खानचा ‘पठाण’, सलमान खानचा ‘अंतिम’, ‘राधे’, अजय देवगणचा ‘मैदान’, ‘भूज’, ‘थँक गॉड’, कार्तिकचा ‘भूलभूलैय्या 2’, विक्की कौशलचा ‘सरदार उधम’, जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’, यशचा ‘केजीएफ 2’, ‘आरआरआर’ हे चित्रपट नवे विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहेत.

z यंदाही डझनभर रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जर्सीमध्ये शाहिद क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. साऊथच्या तेलगू चित्रपटाचा हा रिमेक आहे. सैफ अली खान आणि आमीर खान ‘विक्रम वेधा’मध्ये झळकणार आहेत. मूळ साऊथच्या  चित्रपटाचे दखील हेच नाव होते. ‘थ्री इडियट’नंतर आमीर आणि करिनाचा ’लाल सिंग चड्ढा’ हादेखील हॉलीवूडच्या सुपरहिट ‘फॉरेस्ट गंप’ या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे. हॉलीवूडच्या ‘रॅम्बो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये टायगर श्रॉफ रफ अॅण्ड टफ लूक पाहायला मिळेल.

नव्या नाटकांची नांदी

येत्या दिवसांत लॉकडाऊनमुळे थांबलेल्या नाटकांचे प्रयोग तर आहेतच, पण काही नव्या नाटय़कृतीदेखील आहेत. त्यामुळे नवे वर्ष नव्या जुन्या नाटकांची मेजवानी देणारे ठरेल. नववर्षात रंगभूमीवर मायलेकीची जोडी एकत्र दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि त्यांची कन्या स्वानंदी बेर्डे यांचे ‘लाखाची गोष्ट’ हे नाटक फेबुवारीपर्यंत रंगमंचावर येईल. भद्रकाली प्रोडक्शनची  देवबाभळी आणि वस्त्रहरण ही गाजलेली नाटपं रसिकांना बघायला मिळतीलच, पण याव्यतिरिक्त तीन नवी नाटपंही रंगभूमीवर येणार असल्याची घोषणा प्रसाद कांबळी यांनी केली आहे. लेखक-दिग्दर्शक संतोष पवार हे तीन नाटकं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतील. संगीत शोले, हीच तर फॅमिलीची गंमत आहे, गो कोरोना गो अशी या नाटकांची नावे आहेत. यातील संगीत शोले, हीच तर फॅमिलीची गंमत आहे या दोन नाटकांच्या तालमी लॉकडाऊनच्या आधी झाल्या होत्या. त्या फेबुवारीपासून पुन्हा सुरू होऊन मार्च- एप्रिलमध्ये ही नाटकं रंगभूमीवर येतील. नाटय़निर्माता संतोष काणेकर यांचे सेकंड इनिंग नाटक यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शनाची जबाबदारीही तेच सांभाळतील.

मराठीत आशयघन चित्रपटांची मेजवानी

नव्या पिढीचे नवीन आशय असलेले चित्रपट मराठीत पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षी केवळ 32 चित्रपट रिलीज झाले होते, यावर्षी साधारण 100 च्या आसपास मराठी चित्रपट रिलीज होऊ शकतात. प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’, रवी जाधवांचा ‘अनन्या’, दिग्पाल लांजेकर यांचा ‘जंगजौहर’ याशिवाय ‘प्रीतम’, ‘ताठ कणा’, ‘येरे येरे पावसा’, ‘ईमेल फिमेल’, ‘आक्रंदन’, ‘आता बस्स’, ‘मेरे देश की धरती’, ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘करंट’, ‘8 दोन 75’, ‘गोदावरी’, ‘सटवाई’, ‘भारत माझा देश आहे’, ‘डार्लिंग’, ‘ओह माय घोस्ट’, ‘स्पेशल’, ‘बेफाम’, ‘मनमौजी’, ‘फ्री हिट दणका’, ‘कलरफुल’, ‘मनाचे श्लोक’, ‘झोंबिवली’, ‘एकदा काय झालं’ अशा विविध विषयांवर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   

जानेवारीत अनेक प्रयोग

जानेवारीत 15-16 नाटकांचे प्रयोग होतील. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर यांचे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या दोन नाटकांचे प्रयोग 9 आणि 10 जानेवारी रोजी मुंबई- पुण्यात होणार आहेत. शुभांगी गोखले, प्रशांत दामले यांचे ‘साखर खाल्लेला माणूस’,  सुनील बर्वे यांचे ‘के दिल अभी भरा नहीं’, उमेश कामत यांचे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकांचे प्रयोगही होणार आहेत.