दलित शब्दाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

प्रसारमाध्यमांनी दलित या शब्दाचा वापर करू नये, असे आदेश प्रेस काउन्सील आणि केद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने द्यावेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. पंकज भोयर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्या. भूषण गवई व न्या. झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. केंद्र सरकारने त्यांची सर्व कागदपत्रे, दस्तावेज, पत्रव्यवहारातून तसेच सर्व नोंदीतून दलित शब्द काढून टाकण्यात यावा, राज्य सरकारनेही एक अध्यादेश काढून शासन व्यवहारात दलित शब्दाचा वापर करू नये आणि माध्यमांनीही या शब्दाचा वापर करू नये, असे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका पंकज मेश्राम यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त निर्देश दिलेत.

पंकज मेश्राम यांनी केलेल्या तीन मागण्यांपैकी एक मागणी यापूर्वीच मान्य झाली होती. उर्वरीत मागणीसंदर्भात न्यायालयाने बुधवारी आदेश दिले. राज्य सरकार येत्या चार आठवड्याच्या आत या संबंधीचा अध्यादेश जारी करणार असल्याची माहिती राज्य सरकारचे वकील दीपक ठाकरे यांनी दिली. तर माध्यमांना या संबंधीचे आदेश देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. अॅड. शैलेश नारनवरे यांनी याचिकाकर्त्यातर्फे काम पाहिले.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाने जानेवारी २०१८ ला यापूर्वीच यापुढे बोलण्यात आणि लेखनात दलित शब्दाचा वापर करता येणार नाही, असे आदेश सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले होते. यापूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार केंद्र सरकारने सरकारी कागदपत्र, दस्तावेज तसेच पत्रव्यवहारात दलित शब्दाचा वापर करण्यास मनाई केली आहे. संविधानात दलित शब्दाचा उल्लेख कुठेही नाही, यास्तव सरकारी कागदपत्रांमध्ये दलित शब्दाचा वापर करू नये, असे आदेश केंद्र सरकारने दिले होते. यापूर्वी १० फेब्रुवारी १९८२ मध्ये एक अध्यादेश काढून हरिजन शब्दाचा वापर करण्यावरही बंदी घालण्यात आली होती. हरिजन म्हटल्यावर कठोर शिक्षेची तरतुद आहे.