पाकिस्तानात आगडोंब उसळला; ठिकठिकाणी दंगल, जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कराची

येत्या २५ जुलै रोजी होणाऱया सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तान आज बॉम्बस्फोटांनी हादरले. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि प्रचारसभांना निशाणा बनवत हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान नवाज शरीफ मायदेशी परतत असतानाच करण्यात आलेल्या या दहशतवादी हल्ल्यात ९० जण ठार तर १८० जण जखमी झाले.

पहिला बॉम्बस्फोट खैबर पख्तुनवा प्रांतातील बन्नू या भागात घडविण्यात आला. मुथाहिदा मजलीस अमाल या पक्षाचे नेते अक्रम खान दुराणी यांच्या प्रचारसभेला निशाणा बनवून हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात पाच जण ठार झाले असून ३७ जण जखमी झाले. मात्र या बॉम्बस्फोटांतून  अक्रम खान दुराणी सुदैवाने बचावले असे पोलिसांनी सांगितले. दुराणी यांनी नंतर लगेचच रुग्णालयाकडे धाव घेऊन जखमींची विचारपूस केली.

खैबर पख्तुनवा प्रांतातील बन्नू येथील बॉम्बस्फोटानंतर दुसरा बॉम्बस्फोट हा बलुचिस्तानातील मस्तुंग या भागात घडवण्यात आला. बलुचिस्तान अवामी पार्टीच्या प्रचारसभेला निशाणा बनवून हा बॉम्बस्फोट घडवला गेला. त्यात त्या पक्षाचे बडे नेते सिराज रायसनी हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी क्वेटा येथे नेले जात असतानाच त्यांचा मृत्यू ओढवला असे जिल्हा पोलीसप्रमुख  मोहम्मद अय्युब अचाकझाई यांनी सांगितले.

दहशतवादाच्या सफायाचा दावा ठराला फोल

दहशतवादाचा सफाया करण्यात आल्याचा दावा पाकिस्तान सरकारने आणि सुरक्षा यंत्रणांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केला होता, पण त्यांचा तो दावा फोल ठरल्याचे आजच्या बॉम्बस्फोटांनी स्पष्ट झाले आहे. या दहशतवादी हल्ल्यांमुळे निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्तानातील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन आणि पंतप्रधान नसिरुल मुल्क यांनी आजच्या दहशतवादी हल्ल्यांचा तीक्र शब्दांत निषेध केलाआहे.

निवडणूक प्रचारसभांना ‘निशाणा’ बनवून घडवण्यात आलेल्या या बॉम्बस्फोटांमध्ये बलुचिस्तान अवामी पार्टीचे बडे नेते सिराज रायसनी हे ठार झाले. ते बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब अस्लम रायसनी यांचे बंधू होत.