इराणी विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेने उडाली खळबळ, हवाई दलाने विमाने पाठवत ठेवली कडक नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेहरानहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. हे विमान दिल्लीच्या हवाई हद्दीत बराच वेळ राहिले आणि यादरम्यान हिंदुस्थान हवाई दलाच्या विमानांनी त्यावर बारीक नजर ठेवली. बॉम्बच्या धमकीनंतर, इराणची राजधानी तेहरानहून चीनच्या ग्वांगझूला जाणारे प्रवासी विमान थांबवण्यासाठी हवाई दलाने आपली लढाऊ विमाने पाठवली. हवाई दलाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

निवेदनानुसार, सकाळी विमान क्रमांक W-581 देशाच्या हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना ही घटना घडली. हिंदुस्थानच्या लढाऊ विमानांनी सुरक्षित अंतरावर या उड्डाणाचा पाठपुरावा केला. ‘विमानाला प्रथम जयपूर आणि नंतर चंदीगड येथे उतरण्याचा पर्याय देण्यात आला. मात्र, पायलटने सांगितले की, त्याला दोन्ही विमानतळांवर विमान उतरवायचे नाही’.

‘3 ऑक्टोबर रोजी, इराणचे एक विमान हिंदुस्थानच्या हवाई हद्दीतून जात असताना बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. हिंदुस्थानी हवाई दलाची लढाऊ विमाने तात्काळ संबंधित उड्डाणाच्या दिशेने वळवण्यात आली, त्यांनी सुरक्षित अंतरावर त्याचा पाठलाग सुरू ठेवला’, काही काळानंतर, तेहरानकडून बॉम्बच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचा संदेश आला, त्यानंतर विमानाने आपल्या अंतिम गंतव्याच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला, असे निवेदनात म्हटले आहे.

‘सर्व पावले हिंदुस्थानी हवाई दलाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) सोबत संयुक्तपणे विहित प्रक्रियेनुसार उचलली,’ असे निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी विमान देशाच्या हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना हवाई दलाच्या रडारच्या निगराणीखाली होते.

इराणी विमान हवाई हद्दीत असताना दिल्ली विमानतळाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) हवाई दलाच्या सतत संपर्कात होता. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने बॉम्बच्या कथित धमकीबाबत दिल्ली एटीसीला माहिती दिली होती.