‘वास्तव कुपोषणाचे’ पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शानदार प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कुपोषणग्रस्त भागातून उपचार सुरू असतानाच ही मुले रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत होतात. ही तिथली समस्या असली तरी अशा दुर्गम भागांत जे डॉक्टर सेवा देतात त्यांचीही स्थिती तितकीच गंभीर आहे. तिथे वीज नाही, त्यांच्या निवासाची स्थितीही अत्यंत दयनीय आहे. रुग्णालयांत उपकरणे चालविण्यासाठी माणसे नाहीत, अशा परिस्थितीत तिथे डॉक्टर राहणारच कसे? त्यांना योग्य सुविधा पुरवून त्यांचे होणारे स्थलांतरण थांबवायला हवे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले.

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या ‘वास्तव कुपोषणाचे’ या पुस्तकाचे शानदार प्रकाशन यशवंतराव चाव्हाण सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘कुपोषणा’सारखा किचकट विषय अत्यंत ओघवत्या शैलीत पुस्तकातून मांडल्याबद्दल डॉ. दीपक सावंत यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, कुपोषण हे केवळ दुर्गम भागातील समस्येचे एक अंग आहे. त्याची अन्यही कारणे असून ती सोडविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. रस्ते, पाणी, शिक्षण, वीज, आरोग्यसेवा या सर्वच सोयीसुविधा कशा मिळतील या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. जर सोयीसुविधा मिळाल्या तरच तेथील डॉक्टरांचे होणारे स्थलांतरही थांबेल.

डॉक्टर तुमची काळजी मी करतोय
डॉक्टर आणि ठाकरे कुटुंबीयांचे ऋणानुबंध वर्षानुवर्षांचे आहेत. हे सर्व असताना मंत्रीपदावरून दूर का केलं, असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल. आजपर्यंत त्यांना जे काही काम सांगितलं ते त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता यशस्वी करून दाखवलं, असा हा शिवसेनाप्रमुखांचा हक्काचा शिवसैनिक मला हवाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. खरं म्हणजे राजकारणात आल्यानंतर एखाद्याला नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री होण्याची स्वप्ने पडतात. ते गैर नाही. मात्र मंत्रीपदावर असताना, आमदार असताना काहीही दोष नसताना थांब म्हटल्यावर थांबणं आणि सांगाल ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार राहणं, असे सहकारी फार कमी असतात. डॉक्टर तुम्ही तर काळजी करीत नाहीतच पण तुमची काळजी मी करतोय हे लक्षात ठेवा, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

कुपोषण दूर करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज – दीपक सावंत
पालघर, मेळघाट या भागात होणारे बालमृत्यू रोखणे हे एक आव्हान होते. आरोग्यमंत्री म्हणून काम पाहताना या ठिकाणी केलेल्या कामामुळे येथील बालमृत्यूचा आकडा कमी झाला. कुपोषणासारखी समस्या सोडविण्यासाठी सांघिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. तिथे अनेक प्रश्न आहेत. मूळ म्हणजे तेथील आरोग्य सेवेचा पाठकणा असलेला आशा वर्कर, आरोग्य सेविका यांचे मानधनही वाढायला हवे. तिथे मोठय़ा प्रमाणावर जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. मुळात कुपोषणाची समस्या तेव्हाच सुटेल जेव्हा हे बाळ जगलं पाहिजे असं त्यांच्या आईवडिलांना वाटेल, अशा शब्दांत डॉ. दीपक सावंत यांनी कुपोषणाची समस्या मांडली.