
>> जयश्री दानवे
सुहृदांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात रेंगाळत असतात. अशा अत्यंत भावपूर्ण आठवणींचे कवडसे म्हणजे यशोधरा काटकर लिखित ‘अपूर्व, अलौकिक, एकमेव’ हा संस्मरणांचा लेखसंग्रह. मराठी साहित्यात कथा, व्यक्तिचित्रणे, आत्मनिवेदनपर लेखन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात दीर्घकाळ मुशाफिरी करणाऱ्या यशोधरा काटकर या लेखिकेचा हा नवा लेखसंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे अलीकडेच प्रकाशित झाला आहे.
शेक्सपिअर म्हणून गेला आहे की, ‘‘नावात काय आहे?’’ पण पुस्तकाच्या ‘अपूर्व,अलौकिक,एकमेव’ या शीर्षकापासूनच त्याचे वेगळेपण आकर्षित करते. यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालणाऱ्या अभिनेत्री सुलोचना, जयशंकर दानवे, डॉ. काशीनाथ घाणेकर, प्रिया तेंडुलकर, प्रशांत-गौरी दामले, राही अनिल बर्वे, ज्येष्ठ साहित्यिका निर्मला देशपांडे अशा दिग्गज कलाकारांपासून आजी लीलाबाई पेंढारकर, वडील नरेंद्र काटकर, मित्रवर्य एजाझ अहमद अशा आप्तस्वकीयांबद्दलची अत्यंत संवेदनशीलतेने टिपलेली संस्मरणे, विविध प्रकारचे पोत असणारी व्यक्तिचित्रणे बनून साकारली आहेत. ही सर्वच मंडळी ‘एकमेव’ आहेत. यातील काही व्यक्तिमत्त्वे प्रसिद्ध, परिचित तर काही लेखिकेच्या व्यक्तिगत आयुष्यातली असल्याने वाचकांना अपरिचित असूनही त्यांच्या व्यक्तिगत-सार्वजनिक आयुष्यांमधला पडदा हळुवारपणे दूर करत, त्या दोहोंची सरमिसळ करत अवतरलेल्या लेखांमधून प्रत्ययाला येणाऱया व्यक्तिरेखांशी, संवेदनांशी वाचक एकरूप होऊन जातो.
या संग्रहातल्या बारा लेखांतून ज्या व्यक्तिरेखा उभ्या राहतात, त्यांची ही अतिशय सुंदर व्यक्तिचित्रणे आणि कर्तृत्वचित्रणे तर आहेतच, त्यातून लेखिकेचा स्नेहबंध पाझरताना प्रत्ययाला येत राहतो. ही व्यक्तिचित्रणे गोष्टीवेल्हाळ असूनही इथे त्याचे स्वरूप अत्यंत आटोपशीर आणि जिवंत प्रकटले आहे. ही मंडळी लेखिकेच्या आयुष्यात आली, तिच्या मनात घर करून राहिली. या व्यक्ती लेखिकेला जशा भावल्या तशा तिने शब्दात मांडल्या.
हिंदी, मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे सात्त्विक व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी. इथे लेखिकेवर मायेची पाखर घालणाऱ्या मावशी बनून अलवारपणे साकारलेल्या दिसतात. नाटय़-चित्रपटसृष्टीत कसदार अभिनयाने दीर्घकाळ आपला ठसा उमटवणारे जयशंकर दानवे, डॉ.काशिनाथ घाणेकर, विलक्षण थरारक कथा लिहिणारे आणि पुढे ‘तुंबाड’चे दिग्दर्शक म्हणून अवतरलेले राही अनिल बर्वे, धडाडीची कार्यकर्ती, लेखिका अन् दूरदर्शनवर ‘रजनी’च्या रूपात घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री-मैत्रीण प्रिया तेंडुलकर, ज्यांनी आपल्या प्रादेशिक कथा-कादंबरी साहित्यातून काौटुंबिक नातेसंबंधाचे अनेक गोफ विणत हर्ष-खेद या भावना व्यक्त केल्या, पारंपरिक समाज-संस्कृतीला छेद देत साहित्याला नवी दिशा दिली, त्या लेखिका निर्मला देशपांडे, त्यांच्या विदुषी कन्या यशोधरा मैत्रा या सर्जनशील व्यक्तिमत्त्वांचे मनोज्ञ चित्रण इथे उमटते. लेखिकेचे वडील नरेंद्र काटकर, पितृतुल्य रणजित देसाई तसेच सासरे गजानन भोसले यांचेही अतिशय सुंदर पोर्ट्रेट इथे उमटले आहे. महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक रणजित देसाई यांच्याशी वडीलकीच्या नात्याने जुळलेली नात्यांची घट्ट वीण लेखिकेचा हात लिहिता होण्यासाठी कारणीभूत ठरली.
गोव्यात पोर्तुगीज अमदानीत जन्मलेल्या नरेंद्र काटकरांनी जीवनाच्या प्रवासात बऱ्या-वाईट प्रसंगांचे टक्केटोणपे खात स्वतःला सतत झऱयासारखे खळखळत ठेवले. अतिशय सर्जनशील जीवन जगत तो वारसा आपल्या मुलींनाही दिला. अशा पितृस्थानी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांबद्दल लिहिताना लेखिका अभिनेता, चित्रकार, शिल्पकार म्हणजे कलाकार, सर्जनशील व्यक्ती हे मिथक तोडून टाकत प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या अंतरंगात सर्जनशीलतेची बीजे पेरलेली असतात हे वास्तव अधोरेखित करत जाते.
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. लेखिकेचे आजोबा चित्रपटतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या लीलाबाई, सरलाबाई आणि बकुळाबाई या पत्नींची समर्पित व्यक्तिमत्त्वे, प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे जगत मुला-नातवंडांना दिलेले संस्कार आणि कुटुंबातला एकोपा वाढवण्याची त्यांची धडपड इथे दिसत जाते. तसेच गोव्यासारख्या निसर्गसमृद्ध प्रदेशात जन्मलेली, लोकसाहित्य व परंपरा यांचे बाळकडू पीत मोठी होत गेलेली, ‘त्या’ चैतन्यरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणारी बालकवयित्री समृद्धी केरकर हिचे चित्रणही आगळे रूप घेऊन उमटले आहे. साहित्यिका माधवी देसाई यांची कन्या म्हणून आईचा जीवनसंघर्ष मांडताना लेखिका खूप हळवी होत जाते. ‘आई’ हा शब्दच मोगऱ्याचा सुगंध पसरवणारा अन् माधवी देसाईंसारखी आई असेल तर! आईबद्दलचे तिचे भावोत्कट विवेचन मन मोहून टाकते.
साहित्याचा अफाट अभ्यास, बहुआयामी अभिरुची व मैत्र जपणारा खराखुरा मित्र एजाझ अहमद, परकेपणाचा लवलेशही न बाळगणारे सिने-नाटय़-मालिकेतील सुप्रसिद्ध कलावंत आणि सख्खे शेजारी प्रशांत, गौरी दामले आणि परिवाराशी जुळून आलेले स्नेहबंध अतिशय भावपूर्ण आहेत. सिने-नाटय़ कलाकाराविषयी सर्वसामान्यांच्या मनात एक कुतूहल असते, पण प्रत्यक्ष आयुष्यात त्या कलाकाराचा स्वभाव अन् वागणे या गोष्टी भिन्न असतात. सातत्याने वैविध्यपूर्ण खलनायकी भूमिका रंगवणारा कलाकार प्रत्यक्षात अतिशय प्रेमळ, कलेशी एकनिष्ठता जपणारा, ते संस्कार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरणारा गुरुवर्य असतो याचे उदाहरण म्हणजे जयशंकर दानवे. ज्यांचे चित्रपट बघत लेखिका लहानाची मोठी झाली, त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा एकदाच योग आला. तरी या कलाकाराच्या आत्मचरित्रातले कवडसे नेमके टिपून लेखिकेने त्यांचे ऋण मानले आहे.
या व्यक्तीपर लेखांना दिलेली शीर्षकेही अर्थपूर्ण वाटतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या प्रतिभाधर्माचा सारांश एकवटतो.उदा ः ‘आवडती’ (सुलोचना),‘असामान्य’ (जयशंकर दानवे),‘अस्वस्थ’ (अनिल बर्वे), ‘मातीतले पाय’ (समृद्धी), ‘इन्फिनिट’ (एजाझ) वगैरे अशा अनेक विशेषणांनी या लेखांना रुपेरी किनार लाभली आहे.
या पुस्तकाच्या पानापानांत उत्स्फूर्तता, उत्स्फूर्ततेतून प्रकटणारी काव्यात्मकता आहे. रेशीम कोषाचे मृदुलधागे अलग करीत राहावे तसे अतिशय हळुवारपणे एखाद्या व्यक्तिरेखेच्या मनाच्या तळाचा थांग लेखिकेने वाचकाला दिला आहे. प्रासंगिक घटना, तत्कालीन परिस्थिती, त्यांना करावा लागणारा संघर्ष, परीस बनून दुसऱ्याच्या आयुष्याचे सोने करण्याच्या योगदानाचे वस्तुनिष्ठ चित्रण वाचकाला बांधून ठेवते. मोजक्या शब्दांत नेमका आशय वाचकापर्यंत पोचवण्याचे कसब कौतुकास्पद अन् तितकेच अभिनंदनास पात्र ठरते. लेखिकेने या संग्रहातून अनेक जवळच्या माणसांशी, वाचकांशी भेट घडवून आणली आहे. हा संग्रह अनेक वाचकांना आपलासा वाटेल यात शंका नाही.
अपूर्व, अलौकिक, एकमेव
लेखिका : यशोधरा काटकर
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : 190, मूल्य : रुपये 260/-




























































