सहा ऋतूंचा निसर्ग सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

नेमके आणि अचूक निसर्गभान असल्याचा प्रत्यय ज्यांच्या साहित्यातून येतो असे मराठीत मोजकेच लेखक आहेत. विश्वास वसेकर हे त्यापैकी एक. त्यांचे ‘ऋतू बरवा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवत यांनी आपल्या ‘ऋतुचक्र’ या पुस्तकात मराठीतील सहा ऋतूंमध्ये निसर्गातील प्रत्येक घटकात होणाऱ्या बदलाची आणि फुलणाऱ्या पाने, फुले, झाडे, वेली इत्यादींच्या नयनमनोहर सौंदर्यस्वरूपाची अनुभूती मराठी महिन्यांना गृहित धरून दिली आहे, तर वसेकर यांनी जानेवारी ते डिसेंबर या क्रमानुसार या निसर्ग घटकांचे स्वरूप आपल्या लालित्यपूर्ण शैलीत प्रकट केले आहे.

याआधी दुर्गाबाई यांच्याबरोबरच गो. वि. करंदीकर, इरावती कर्वे, माधव आचवल, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनीही आपल्या लेखनातून निसर्गविषयक जाणिवांची झलक दाखवली होती. मात्र दुर्गाबाईंचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवला तो मारुती चितमपल्ली, डॉ. शरदिनी डहाणूकर, व्यंकटेश माडगुळकर यांनी. त्याच वेळी विश्वास वसेकर या मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलेल्या व अठावन्न वर्षे तिथेच काढलेल्या या लेखकाच्या ललित गद्याला शेतकरी जीवनातील ग्रामीण संवेदनशीलतेचा स्पर्श झाला आणि त्यांचे निसर्गविषयक लेखन त्यात न्हाऊन निघाले. त्यात कृषी संस्कृतीचा एक फ्लेवर आहे आणि प्रादेशिकतेचाही किंचित अंश आहे. पुण्यात त्यांचे आठ वर्षे वास्तव्य होते. त्या वास्तव्यातून पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले अतिशय वृक्षसमृद्ध शहर असल्याचे ते सांगतात. कदंब, अर्जुन, कांचन, चंदन, पांडव, शिरीष, सोनसावर ही पुण्याची खासियत असून त्यात महोगनी, उर्वशी, सोनसावर असून त्यात यासारखी आपली आवडती झाडेही ते सांगून जातात.

निसर्गात नखशिखान्त बुडालेल्या या लेखकाचे निसर्गविषयक सर्व घटकांचे अचूक भान आणि ज्ञान त्यांची सौंदर्यसृष्टी टिपत जाते. ऋतुमानाप्रमाणे बदलणारे विलोभनीय आविष्कार, महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातच नव्हे तर जगातील निसर्गात दिसणारे त्यांचे विविध नजारे, त्यांची शास्त्रीय मिमांसा करीत त्यांच्या नावाविषयी असलेले काही थोरामोठ्यांचे समज-गैरसमज ते दूर करतात. कोणत्या ऋतूमध्ये हे निसर्गाचे घटक बहरतात आणि मनाला कसे सुखावतात याची इत्थंभूत माहिती लालित्यपूर्ण शैलीत देतात. त्यातही आकाशापेक्षा जमिनीकडे त्यांचे जास्त लक्ष असून ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे!’ एवढेच त्यांना अभिप्रेत असल्याचे ते नमूद करतात.

जानेवारी हा खास गुलाबाचा महिना हे सांगताना त्याच्यावर झालेले असंख्य प्रयोग त्यांना अत्याचार वाटतात. जानेवारीत फुलणाऱ्या निशिगंधाचे प्रकार, पांढरी आणि गुलाबी कण्हेरी, वाळुक हे फळ, हरभरा, अंबाडीचं फूल, संक्रांतवेल बहरताना पाहण्याची मौज, शिशिराच्या दुसऱ्या टप्प्यात होणारी पानगळ, पानांचा संभार उतरवून ठेवणारा ‘महारुख’ हा महावृक्ष, लेखकाला आकर्षून घेणारे सोनसावर आणि पिवळ्या कांचनाचे झाड, जास्वंदीच्या आणि रानफुलांच्या विविध तऱ्हा, फेब्रुवारीतील बांबू, कांचन, आपटा, साग, चाफा यांची न पाहवणारी पानगळ त्यांना अस्वस्थ करते. वसंताची चाहुल लागताच फुलायला लागणारा चाफा, पळस, सावर, चारोळीच्या झाडाच्या प्रत्येक फळांत असलेली चारोळीची बी, अजानवृक्ष आणि पिंपळाच्या झाडातील फरक, फेब्रुवारीत बहर येणारे भरपूर उपप्रकार, कुमुदिनी म्हणजे कमळ नव्हे तर ‘वॉटरलिली’च. अशा कितीतरी फुलझाडांची माहिती लेखक देतो.

15 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळातील वसंत हा पूर्ववसंत तर उरलेला उत्तरवसंत असे सांगताना पूर्ववसंत हा आंब्याच्या फुलांचा, पळसाचा तर उत्तरवसंत हा अमलतास आणि गुलमोहराच्या भडक फुलांचा. पूर्ववसंत हा सुगंधोत्सव तर उत्तरवसंत हा रूपोत्सव असे सांगताना हिंदुस्थानाइतकी आंब्याची झाडे इतर कुठल्याही देशात नसल्याची मौलिक माहिती ते देतात आणि त्याचे प्रकार आणि वैशिष्ट्येही सांगतात. प्रचंड प्रमाणात सुगंधाची निर्मिती करणारे कडुनिंबाचे झाड, आकार, रंग, सौंदर्य आणि सुगंध ज्यात एकवटले आहेत तो नागचाफा याच महिन्यातला. बकुळ फुलांचा लाजवाबपणा, चिखलदऱ्यातील सिल्व्हर ओक, कवी वसंत बापटांना लुभावणारं ब्राझिलमधील जॅकरंडाचे सुंदर फूल, मधुमालतीच्या वेलाचं रहस्य, कमळांच्या फुलांचे प्रकार हे सारेच विलोभनीय वाटते.

एप्रिलमध्ये फुलणारा सुगंधी मोगरा, अर्जुनवृक्ष, नितांतसुंदर शिरीषाचे झाड, भलामोठा गोरख, चिंच वृक्ष, टरबुजाच्या वाड्या, दुर्लक्षित आणि उपेक्षित अशा कोहळ्याचे चविष्ट वडे, मेमधील ग्रीष्मातील बहावा किंवा अमलतास झाड, मुलायम स्पर्शाची करंज झाडाची पानं आणि पांढऱ्या-गुलाबी रंगाची फुलंही तितकीच आकर्षक वाटतात. पांगाऱ्याचं रंगसुंदर झाड, भुईचाफा, ऑर्किड आणि गुलमोहराच्या फुलांचा सडा याची सुंदर वर्णने यात आहेत. जूनमध्ये चिंचोक्यातून उगवलेला चिंचेचा पहिला अंकुर, बहरणारे मोहाचे, मेंदीचे झाड, मोहरी, पिंपळ, उंबराचे झाड, कवठाचे वृक्ष यांच्या वर्णनाबरोबर चंदनाच्या झाडाला सुगंध प्राप्त व्हायला तब्बल 25 वर्षे लागतात, ही माहितीही मिळते. जांभूळ वृक्ष आणि रानजाई आणि घोसाळ्याच्या वेलींची वर्णने बहारदारच. जुलैमध्ये फुलणाऱ्या फळभाज्या, सुगंधी फुलझाडांचा बहर, ऑगस्टमधील अंबाडीची भाजी, सौंदर्यलक्ष्मी मुचपुंदाचे झाड, जाई, जुई, अबोली, सुरंगी पाहावी, तर त्याच महिन्यात हे लेखकाचे निरीक्षण आहे. सप्टेंबरमध्ये फुलणारं पारिजातकाचं झाड, घाणेरी, तेरडा आणि गुलबासाची रंगत वेगळीच. ऑक्टोबर महिन्यात कास पठारावरील रानफुलांचा देखणेबल पुष्पोत्सव. नोव्हेंबरातील मायाळूंच्या पानांची भाजी, मनभावन केवडा आणि मरवा. डिसेंबरात बहरणारी कमळफुले, रिठा, मुचपुंद, निलगिरी, नंदीवृक्ष आणि सुरूच्या झाडांची वर्णनेही मनाला लुभावणारी वाटतात.

विश्वास वसेकर हे खऱ्या अर्थाने निसर्ग जगलेले लेखक आहेत. या विषयाचे त्यांचे सखोल आणि अचूक ज्ञान, निसर्गाविषयी असलेली वास्तव जाणीव आणि सौंदर्यदृष्टी याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानांत येतो. म्हणूनच सहा ऋतूंचा हा अनुपम सोहळा कुणालाही मनात साठवून ठेवावासा वाटेल.

ऋतू बरवा

लेखक : विश्वास वसेकर

प्रकाशक : साधना प्रकाशन

पृष्ठ : 152, मूल्य : रुपये 200/-