
>> सोनाली शहा
महाराष्ट्र प्रदेशाचे भौगोलिकदृष्टय़ा सह्याद्रीच्या डोंगररांगांमुळे दोन भाग पडले आहेत. त्यापैकी पश्चिमेचा भाग म्हणजे कोकण. विभाजन होऊनही कोकण हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. कोकणातील स्थापत्य, निसर्ग हा नेहमीच पर्यटकांना व निसर्गप्रेमींना भुरळ घालीत आला आहे. अशा कोकणातील रमणीय परिसर आहे संगमेश्वर व देवरूख. या परिसरातील समृद्ध पारंपरिक वारसा आपल्या ‘सफर संगमेश्वर-देवरुख परिसराची’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे श्री. आशुतोष बापट यांनी.
अनादी कालापासून मानवाला भासणाऱया कोणत्या तरी काल्पनिक शक्तीचे भय त्याला कायमच सोबत करीत आले आहे. या भयापोटी भयाचे निराकरण करण्यासाठी व सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी, अवकृपा टाळण्यासाठी मानवाने दगडाला प्रतीकात्मक रूपात पुजले, दगडाला आकार दिले, देवत्व बहाल केले. संबंधित माहात्म्ये रचली गेली व त्याचबरोबर दंतकथाही आल्या. देवभूमी कोकण तरी त्याला अपवाद कशी असणार? या पुस्तकात देव, देवस्थाने, त्याच्याशी निगडित दंतकथा, स्थानिक रूढी, परंपरा व त्यांचे स्वरूप, स्थानिक उत्सव इत्यादींचे उत्कंठावर्धक विवेचन वाचावयास मिळते. परिसरातील भौगोलिक बारकावे, दोन ठिकाणांमधील अंतरे, प्रवासासाठी लागणारा वेळ, पर्यायी मार्ग, गडकिल्ले, जवळपासच्या निवासाच्या सोयी संपर्क क्रमांकासहित लेखकाने पुस्तकात अंतर्भूत केल्या आहेत. कोकण प्रदेशाला समृद्ध किनारपट्टी लाभल्याने प्राचीन काळापासून व्यापारीदृष्टय़ा हा प्रदेश महत्त्वाचा मानला जातो. समुद्री प्रवास व व्यापारासाठी महत्त्वाचे साधन म्हणजे नौका व जहाजे. संगमेश्वरमध्ये आपल्या आरमारासाठी नौका निर्मिती करावी ही कल्पना छत्रपती शिवरायांची. या नौकांची बांधणी, त्यामागील तंत्रज्ञान, त्यासाठी लागणारे लाकूड मिळवण्याची ठिकाणे इत्यादींची इत्थंभूत माहिती या पुस्तकात आहे. आपल्या देशातील लोकसंस्कृती व परंपरांमध्ये देवी-देवतांची उपस्थिती व्यापक आहे. ग्रामदैवत, कुलदैवत यांच्याशी निगडित लोककला आहेत, दंतकथा आहेत. प्रत्येक लोककलेमध्ये वैशिष्टय़पूर्ण वेशभूषा, प्रथा, रूढी, आचार यांचे वेगळेच समीकरण बघावयास मिळते. संगमेश्वर येथील अशाच मनमोहक व रंगीबेरंगी शिंपणे महोत्सवाचे तसेच शक्ती तुरा-कलगी तुरा या परंपरेचे वर्णन लेखकाने केले आहे.
संग्रहालय म्हणजे मानवी जीवनाच्या इतिहासाचा आरसा. यातील जतन केलेल्या वस्तू पुढच्या पिढीला अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात, शिवाय पूर्वजांचा वारसा नीट जपून ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याची जाणीवही होते. संग्रहालयाचे हे महत्त्व जाणून लेखकाने परिसरातील दोन कलाविषयक संग्रहालयांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
पुस्तकाची भाषा ओघवती, अभ्यासपूर्ण आहे व स्थापत्य रसग्रहण उत्तम. लेखांमधल्या तपशीलवार वर्णनामुळे वाचकांसमोर स्थळांचे, मंदिरांचे चित्र हुबेहूब उभे राहते. शिवाय उत्तम छायाचित्रांची जोड आहेच. मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाच्या अंतरंगाचे प्रतिबिंब. संपूर्ण पुस्तकाचा आशय मुखपृष्ठावर कसा आणता येईल, मुखपृष्ठ आकर्षक कसे करता येईल ही जबाबदारी डिझायनरने सक्षमरीत्या पार पाडली आहे. संगमेश्वर व देवरूख टापूतील भटकंतीची मनीषा बाळगणाऱया उत्साही पर्यटकाने हे पुस्तक जवळ बाळगावे व निर्धोकपणे ईप्सित स्थळी पोचावे इतके हे माहितीपूर्ण आहे. येथे हेही नमूद करावयास हवे की, पुण्यातील स्नेहल प्रकाशनाच्या श्री. रवींद्र घाटपांडे यांनी पुस्तकाच्या निर्मिती मूल्यामध्ये कोणतीही तडजोड न करता सुंदर पुस्तक मुद्रित केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना चिपळूणनंतर थेट रत्नागिरी किंवा गणपतीपुळे इथेच पर्यटक जातात. चिपळूण आणि रत्नागिरी यामध्ये असलेला हा संगमेश्वर-देवरुख परिसर प्रवासातच निघून जातो. त्यामुळे लेखकाने मुद्दाम हा प्रदेश निवडला आणि तिथे असलेले निसर्गवैभव या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर मांडले आहे.
सफर संगमेश्वर देवरुख परिसराची
लेखक : आशुतोष बापट
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पृष्ठे : 80, मूल्य : रुपये 100/-

























































