
>> डॉ. विजया वाड
मृत्युंजय कर्ण. महाभारत पर्वाचा कालातीत नायक. ज्येष्ठ कादंबरीकार शिवाजी सावंतांनी रेखाटलेले हे कर्णपर्व शब्दातीत…
काही कहाण्या अजरामर असतात. काही व्यक्तिरेखा युगानुयुगे जिवाला चटका लावतात. सूर्यपुत्र कर्ण याची कहाणी अशीच प्रत्येक हृदयाला चटका लावणारी. एक दोन नव्हे एकवीस आवृत्त्यांचे भाग्य ‘मृत्युंजय’ला लाभावे यासारखे सौख्य ते कोणते? जी कथा एकविसाव्या शतकातही तरोताजाच वाटेल असा हिचा तेजोमय इतिहास! एखाद्याच्या नशिबात दुःख, यातना किती लिहाव्यात विधात्याने? सूर्यपुत्र कर्ण यांचे सारथीपुत्र म्हणून जगणे हे धगधगते अग्निकुंड आहे. शिवाजी सावंत यांनी वापरलेले ‘प्रथम पुरुषी’ तंत्र कादंबरीशी वाचकाचे आत्मीय नाते जुळविते.
हे पुस्तक प्रकाशात आल्यावर आचार्य अत्रे यांनी त्यावर प्रचंड अग्रलेख लिहिला होता. दीनानाथ दलालांचे सुंदर मुखपृष्ठ हा या पुस्तकाचा भाग्ययोग आहे.
‘मृत्युंजय’ म्हणजे मृत्यूवर जय मिळवणारा! महामानव!
‘जन्म मरण चुकले नाही मानवास’ जेथे
‘मृत्युंजय’ जन्मुन गेला अजरामर झाला येथे
कवच कुंडलांचे दान, हीच त्याची जीवनशक्ती
सूर्यपुत्र कर्णावरती कितिकांची जडली भक्ती’
असेच ज्याचे वर्णन करता येईल असा हा महारथी! उदार मनाचा. योद्धा. कादंबरीची सुरुवातच दिलखेचक आहे. कर्ण स्वतः बोलू लागलाय आपल्याशी. लेखक म्हणतो, जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसे मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. आणि कर्णाचे जीवन म्हणजे समरांगणातला भाता. अर्थात बाणांचा भाता तो! विविध घटनांचे बाण… तेही जिव्हारी लागणारे ज्यात ठासून भरले आहेत असा भाता!
गंगामातेच्या पवित्र तीरावर वसलेली रमणीय चंपानगरी. निसर्गाच्या कुशीत पहुडलेलं सुंदर चिमुकलं गाव. तिथे अधिरथ- राधाच्या मायेच्या पंखात दडलेलं सुंदर बालपण. धाकटा भाऊ शोण याच्या असंख्य गोड आठवणी. राधामातेचं अविरत प्रेम. त्याच्या कानातील, अंगावरील कवच कुंडलांची चर्चा. ‘वसु, गंगेच्या बाजूला कध्धी कध्धी जायचं नाही हं’ असं मायेनं, डोक्यावरून हात फिरवीत म्हणणारी राधामाता… नि वसुला असलेली गंगामातेची अनिवार ओढ! सुसाट वेगाने बाबांच्या रथात बसून धाकटय़ा भावासोबत गंगेवर जाणं… कर्णाचं बालपण वाचताना जीव रंगून जातो. एकाच वेळी दोन बाण सोडून दोन वेगवेगळी लक्ष्यं साधणारा शोणाचा दादा आपल्याला भुरळ पाडतो.
हस्तिनापूर! कौरवांची सामर्थ्यशाली नि संपन्न राजधानी. तिचे वर्णन बहारदार झाले आहे. बाबा तिथले प्रमुख सारथी, दुर्योधनाचे झालेले प्रथमदर्शन, तेही योद्धय़ाच्या वेशात… अगदी मनावर ठसते. सर्वात प्रभावी अस्त्र कोणते? भाषा मित्रांनो! तीच वैचारिक वादळे उठविते, हसविते, रडविते. लेखकाचा तो सामर्थ्यशाली शक्तिदाता असा भात्यातला बाण जणू.
अर्जुनाची आणि कर्णाची प्रथम भेट फार सुरेख रंगविली आहे. गुरुदेव द्रोण नजरेसमोर उभे राहतात. सर्पाला बाणाने विद्ध करण्याचा वेध घेणाऱया पार्थाला ते उच्च स्वरात म्हणतात, ‘अर्जुना, त्या यःकश्चित सर्पाला मारण्यापेक्षा प्रथम तुझ्यामधल्या सर्पाला ठेचून काढ. क्रोधाचा सर्प महाभयानक असतो. दुर्बलावर हात उचलू नकोस!’ वाचताना मनास केवढी मोठी शिकवण मिळते ना? अर्जुनाला अजिंक्यवीर घोषित करत असताना कर्णाची झालेली घालमेल, त्याने घेतलेले आव्हान आणि पितामह भीष्मांचा ‘न्याय’ वाचताना हृदयाची स्पंदने वाढतात. ‘तुझे कुल सांग’ या प्रश्नावरची खऱया सूर्यपुत्राची घालमेल वाचत असता डोळे आसवांची मौक्तिके सांडतात इतके धारदार नि अस्वस्थ शब्द!
दुर्योधनाची मित्रता, प्रेम, त्याने बहाल केलेले राज्य या साऱया गोष्टी मोठय़ा वाचनीय झाल्या आहेत. ‘वृषाली’ म्हणजे पतिचरणावर वाहिलेलं भक्तिभावाचं कमलपुष्प. अंगदेश राजा कर्ण… ‘अंगराज’ तिचा पती! तरीही ‘सूतपुत्र’ म्हणून वेळोवेळी झालेली त्याची हिणवणी काळजास घरे पाडते. ‘मी सूतपुत्रास वरणार नाही’ म्हणून स्वयंवरात कर्णास अव्हेरणारी द्रौपदी- पांचाली- अन् द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग वाचताना जीव हेलावतो. ‘शोण’ हे बंधुप्रेमाचे उज्ज्वल प्रतीक आहे. हे प्रकरण विलक्षण रंगले आहे. भीष्मराजांशी असलेले अनुबंध घट्ट आहेत. ते ‘विजययात्रा’ प्रसंगी दृग्गोचर होतात.अंगराज कर्ण नुसताच शूरवीर नव्हता. तो दानशूरही होता. पराकोटीचा दानशूर! देवराज इंद्राने मृत्युंजयाजवळ काय दान मागावे? कवच-कुंडले? आणि कर्णाने ती सहज द्यावी?
युद्धात साक्षात श्रीकृष्णाने अर्जुनास दिलेली. निःशस्त्र, पदस्थ कर्णावर बाण सोडण्याची. कर्णासाठी आपले मन विद्ध होते. ‘हा अधर्म आहे’ म्हणणाऱया राधेयाला श्रीकृष्ण म्हणतो, ‘द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भरसभेत तिला वारांगना म्हणालास. तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ शेवटच्या श्वासात आपला दात दान करणारा कर्ण, ‘सूतपुत्र’ म्हणून हिणवला गेलेला कुंतीपुत्र- सूर्यपुत्र पहिला ‘पांडव’, दिला शब्द पाळण्यासाठी मित्र-सखा दुर्योधनाची एकनिष्ठ पाठराखण करणारा ‘मृत्युंजय’ योद्धा मनात कायमचे घर करतो हे शिवाजी सावंतांचं यश! ही कादंबरी नव्हे, हा भावनांचा कल्लोळ आहे. इतिहासाचे सुवर्णमय पान नि साहित्याचा अनमोल अलंकार आहे. युवक-युवतींनो, जरूर वाचा ‘मृत्युंजय.’
मृत्युंजय
लेखक – शिवाजी सावंत
प्रकाशक – काँटिनेंटल प्रकाशन, विजय नगर, पुणे-30
पृष्ठे – 628, किंमत – रु. 450































































