
>> विक्रांत विजय वैद्य
ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांचे ‘पासष्टायन’ हे पुस्तक नुकतेच लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. ‘पासष्टायन’चे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक आहे. आतील पानावरील ‘प्रणाम कोटि करांचे’ यामधील छायाचित्रे म्हणजे आपली सर्वांचीच श्रद्धास्थानेच आहेत. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांची प्रस्तावना फार आवडली. यातील ‘तटस्थपणे विषयाला थेट भिडून पत्रकारिता केली’ हे वाक्य मनोमन पटले. दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया होऊनसुद्धा योगेश त्रिवेदी यांनी जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात सुमारे पासष्ट लेख लिहून ते पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा संकल्प करून तो पूर्णही केला.
‘स्वतःच्याच मस्तीत रमणारा अवलिया अर्थातच विजय वैद्य.’ वाचताना खूप मजा आली. अनेक बारीकसारीक संदर्भ आणि तपशील कळले. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमधील अनेक राजकीय किस्से, संदर्भ तसेच विवेचनात्मक राजकीय लेखन अतिशय सुंदर आहे. श्री साईबाबा यांच्या जन्मस्थान वादावरील लेख, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव महाविद्यालयाला द्यावे तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ व्हावे ही केलेली सूचना तसेच ‘एल्फिन्स्टन’चे नामांतर, ‘संभाजीनगर’ आणि ‘धाराशीव’ ही प्रलंबित असलेली मागणी या विषयांवरदेखील ऐतिहासिक संदर्भ देऊन अतिशय सुंदर लेख आहेत. आमच्या विधान भवनातील लोकप्रिय सुरक्षा कर्मचारी यांच्यावरील लेख फार आवडला.
जीवन विद्या मिशनचे कोरोना लढय़ातील योगदान, गिरीश वसंत त्रिवेदी यांनी ‘आहुति’ कशा प्रकारे सांभाळलं याचं ‘पत्रकारितेतील भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा गिरीश’मध्ये केलेलं वर्णन वाचलं. डॉ. विलास कुमठेकरसर, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, जयंत करंजवकर यांच्यावरील लेख अतिशय आवडले. स्वातंत्र्यवीर सावरकर हा सर्वांचा जिवाभावाचा विषय. या पुस्तकातदेखील त्याचा उल्लेख आहेच.
मराठवाडय़ातील धाराशीवमधील धडपडय़ा युवकांनी सुरू केलेला ‘अंबरनाथ टाइम्स’ याचा परिचय लेखाच्या माध्यमातून करून दिला. ‘अनुभव’ विद्यापीठाचा ‘डबल ग्रॅज्युएट’ : जयेश वसंत त्रिवेदी हा लेखदेखील आवडला. निवृत्ती वेतनापासून वंचित असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर वाचा फोडणाऱया लेखाबाबत धन्यवाद. विशिष्ट व्यक्ती, समाज, पक्ष अथवा संघटना यांच्या ध्येयधोरणांशी चिकटून न राहता विविध विषयांवर परखड मत मांडून जास्तीत जास्त विषयांना न्याय देण्यासाठी योगेश त्रिवेदी हे नेहमीच प्रयत्नशील असतात ही बाब जानेवारी 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात लिहिलेल्या पासष्ट लेखांमध्येदेखील दिसून येते, असे माझे मत आहे. ‘परिवार पुष्प’मधील सर्व छायाचित्रे अतिशय सुंदर. पुस्तकाच्या शेवटचा लेखकाचा परिचयदेखील आवडला.
‘पासष्टायन’
लेखक : योगेश वसंत त्रिवेदी
प्रकाशक : उदय पै यांचे एड आर्ट्स, बोरिवली
पृष्ठे : 242, मूल्य : रुपये 200/-





























































