
>> अस्मिता प्रदीप येंडे
आपल्या मूलभूत गरजांसोबतच शिक्षण ही मुख्य गरज बनली आहे. शिक्षणामुळे माणसाचे अज्ञान दूर होते. अंधश्रद्धा, फसवणूक यापासून आपले रक्षण करणारे शिक्षण हे शस्त्र हाती असणे आवश्यक आहे. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी ‘मातीतील हिरे’ ही कादंबरी म्हणजे दिनेश आणि कमल या बहीण-भावाच्या संघर्षाची कहाणी आहे. घरची परिस्थिती बेताची असूनही शिक्षणाच्या मदतीने हे दोघेही आपले उज्ज्वल भविष्य कसे घडवतात. त्यामागे त्यांची मेहनत, प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि ध्येयवादी विचार आणि प्रयत्नांची पराकाष्ठा असते, हे वर्णन वाचताना खरेच एक प्रकारे मनाला ऊर्जा प्राप्त होते.
दिनेश आणि कमल हे दोघेही या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेत. जनार्दन नेवरे म्हणजेच दिनेशचे वडील हे शेतकरी असून कष्टाने धान्य पिकवतात. घरच्या स्थितीची जाणीव ठेवून ही दोन्ही मुले अगदी प्रगल्भतेने वागत होती. आपल्या या गरिबीमुळे आपली मुले अशिक्षित राहू नयेत तसेच आपल्यासारखी वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून जनार्दन आणि पार्वती कष्ट करून संसार चालवतात.
दिनेश आणि कमलच्या शाळेतील गुरुजी त्यांची हुशारी जाणून असतात. या मुलांना उच्च शिक्षण मिळावे, त्यांची प्रगती व्हावी म्हणून देशमुख गुरुजी सतत त्यांच्या पाठीशी उभे राहतात. जीवनातील क्षणोक्षणी बदलणारे चित्र अगदी नेमकेपणाने लेखकाने मांडले आहे. शेतकरी कुटुंबाच्या असणाऱया समस्या, अडचणी यात अधोरेखित केल्या आहेत. अचानकपणे पार्वता झालेला आजार, त्या आजारपणात तिचा झालेला मृत्यू, त्यात जनार्दनचे सुमनशी विवाह होणे, सुमनच्या मुलाचा उनाडपणा, पांडुरंगला झालेला तुरुंगवास असे विविध प्रसंग घडत असताना मनाचा तोल ढासळू न देता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणाऱया ध्येयवेड्या बहीण-भावाची ही कहाणी आहे.
नंतर त्या दोघांची नोकरीसाठी धडपड सुरू होते. अथक प्रयत्नांनी ती दोघे उच्च पदावर नोकरी मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करतात. हे करताना त्यांना बऱयाच अडचणी येतात. पुढे जाण्यासाठी सतत अभ्यासाचा ध्यास घेऊन सकारात्मक जाणिवेने जगण्याची मूल्ये शिकवणारी ही कादंबरी आहे. शिक्षणामुळे आपण आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो आणि समाजात मानाचे स्थान मिळवू शकतो, कमी गुण मिळाले किंवा नापास झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारण्याचा विचार करणाऱया तरुण पिढीसाठी ही कादंबरी प्रेरणादायी आहे.
(मातीतील हिरे कादंबरी लेखक : आड. आर. बी. मातकर प्रकाशक : शारदा प्रकाशन मूल्य : 200 रुपये)





























































