अभिप्राय – खडतर प्रवासाची गाथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मनीषा कुलकर्णी–आष्टीकर

माणसाचा जन्म झाला की संघर्ष आलाच. मग तो कधी भाकरीसाठी, कधी स्वप्नांसाठी कधी कधी तर स्वतच्या अस्तित्वासाठीही. पण या खडतर प्रवासातून कोण कशी वाट काढतं हे महत्त्वाचं. अशाच खडतर प्रवासाची कहाणी आहे, सातारा जिह्याचे उपशिक्षणाधिकारी असलेले श्री. रवींद्र खंदारे यांचं ‘संघर्ष हेच सामर्थ्य’ हे पुस्तक.

हे पुस्तक म्हणजे लेखकाचं आत्मकथन. बालपणी लेखकाच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या वडिलांनीही गरिबीचे चटके सोसलेले होते. या परिस्थितीचं वर्णन, मामाच्या शेतात केलेली धमाल, शाळेतल्या खोड्या, विटीदांडू, सुरपारंबी, लगोरी असे खेळ, दूरदर्शनवरील गोट्या, रामायण, महाभारत यांसारख्या मालिकांची आवड, चित्रपट पाहण्याची आवड, बालपणी मनावर कोरलेल्या कितीतरी घटना लेखकाने सुरुवातीला सांगितल्या आहेत. ज्यातील बऱयाच आठवणी वाचकाला स्वत:च्या बालपणात घेऊन जातात.

लेखक बालपणी खोडकर होते, पण अभ्यासातही हुशार. म्हणूनच त्यांचा मामा त्यांना साताऱयाला शिकायला नेणार होता. लेखकाला या गोष्टीचा आनंदही झाला होता, पण हरणाआजी व रखमाआजी यांनी ‘हे पोरगं तिथं कुठंबी पळंल, इथंच लई खोडकरपणा करतंय,’ असं म्हटल्यामुळे मामाच्या मनाची घालमेल झाली आणि साताऱयाला शिकायचं लेखकाचं स्वप्न कसं भंगलं हे लेखक फार मजेशीररीत्या सांगतात.

लेखक सारं मजेशीररीत्या सांगत असले तरी आयुष्याचा बराच काळ मजा हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता. जीवनाशी कसं लढायचं आणि कसं पुढं जायचं एवढंच ते शिकत राहिले. शिक्षणासाठी त्यांना कुठंही राहावं लागलं, गाव सोडावं लागलं, सावकाराच्या कर्जात कोंडी झाली तरी ते स्वत:च स्वत:ची वाट काढत राहिले.

हे पुस्तक म्हणजे सहज सुचलेल्या गोष्टी नव्हेत तर लेखकाने अनुभवलेला धगधगता कुंड आहे. संघर्ष जर अटळ असेल तर त्यातून कसं पार व्हावं, जीवनातील खाचखळगे भरून काढताना आपल्या माणसांची साथ कशी मोलाची असते असे कितीतरी पाठ या पुस्तकातून शिकायला भेटतात. हे आत्मकथन सामान्य माणसालाही मोठी स्वप्ने पाहण्याचा अधिकार असतो हे सांगणारं आहे, प्रेरित करणारं आहे, प्रेरणा देणारं आहे.

संघर्ष हेच सामर्थ्य (आत्मचरित्र)   प्रकाशन : चपराक प्रकाशन   पृष्ठसंख्या : 296   मूल्य : 400