
बोरिवलीच्या मागाठणे येथील एमएचबी कॉलनीतल्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांना पुढील दीड वर्षात म्हाडाच्या वतीने घरे बांधण्यात येतील, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज दिली. एमएचबी कॉलनीतल्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या अडचणीच्या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. एमएचबी कॉलनीतील येथील इमारत क्रमांक 1 व 9 या घरांमधील भाडेकरू मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारतीतील रहिवासी असून ते गेल्या 25- 30 वर्षांपासून मागाठणे येथील संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. त्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्यामुळे येथील रहिवाशांना दुसऱया संक्रमण शिबिरात त्वरित स्थलांतरित करण्यात येईल. त्यानंतर तेथे रहिवाशांना त्यांच्या हक्काचे 300 चौरस फुटांची घरे बांधून देण्यात येतील, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
रहिवाशांना ज्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार आहे त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी व रंगरंगोटी करण्यात यावी. तसेच विकासकाने त्या रहिवाशांना येत्या दीड वर्षात घरे उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे असे आदेशही आव्हाड यांनी यावेळी दिले. या बैठकीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश लोखंडे, विकासक बी. जी. शिर्के, एमएचबी कॉलनी संक्रमण शिबिरातील रहिवासी व अन्य अधिकारी उपस्थित होते.




























































