
दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी खेळाडूंच्या नावांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये क्रिकेटपटू रोहित शर्माची ‘राजीव गांधी खेलरत्न’ या पुरस्कासाठी शिफारस करण्यात आली आहे. याप्रसंगी हिंदुस्थानचा बॉक्सर अमित पांघल याने या निवडीवर टीका करताना म्हटले की, 10 ते 12 देशांमध्ये खेळण्यात येत असलेल्या खेळातील क्रिकेटरसमोर 100 देशांना भिडून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्य़ा खेळांतील खेळाडूंना नेहमीच दुर्लक्षित केले जाते. क्रिकटपुढे अन्य खेळ पोरकेच ठरतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमित पांघलने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने एक गोल्ड व एक कास्य पदक जिंकले आहे, तसेच आशियाई गेम्समध्ये एक गोल्ड, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एक रौप्य आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक रौप्य जिंकण्यात बाजी मारलीय. मात्र त्यानंतरही त्याची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड केली जात नसल्याकडे त्याने लक्ष वेधले.
एकदा ‘खेलरत्न’ मिळाल्यानंतर ‘अर्जुन’ कसा काय मिळू शकतो?
साक्षी मलिक व मीराबाई चानू यांना याआधी खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. आता या दोघींचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. खेलरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार. एकदा हा पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा त्या खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी कशी काय शिफारस करण्यात येऊ शकते? असा सवालही पुढे त्याने उपस्थित केलाय. एवढेच नव्हे, तर दरवर्षी क्रिकेटपटूला अर्जुन किंवा खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरेसे पॉइंट नसल्यानंतरही त्यांना गौरवण्यात येते, अशी टीकाही पुढे त्याने केली आहे.
पारदर्शकतेची गरज
या वर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रकिया सुरू झाली तेव्हा केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहून क्रीडा नीतीमध्ये बदल करण्याची विनंती केली होती, पण या पत्राचे उत्तर काही मिळाले नाही. पुरस्कार निवडीमध्ये पारदर्शकता असायला हवी. जी व्यक्ती पुरस्कारासाठी खरी हकदार आहे, तिलाच तो मिळायला हवा अन्यथा पुरस्काराचे महत्त्वच कमी होऊन जाईल, अशी भीतीही अमित पांघल याने व्यक्त केली.


























































