सुपरस्टार बॉक्सर डिंको सिंगचे निधन, 2017पासून यकृताच्या कर्करोगाने त्रस्त

आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर डिंको सिंगचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 42 वर्षीय हा बॉक्सर 2017पासून यकृताच्या कर्करोगावर उपचार घेत होता. गेल्या वर्षी कोरोनाला हरविणाऱया या गोल्डन बॉयला कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला मात्र पंच मारता आला नाही. डिंको सिंग याच्यावर काही दिवसांपासून दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात उपचार सुरू होते. डिंको सिंगच्या पश्चात पत्नी बाबई एनगांगोम, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

डिंको सिंगच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह, बॉक्सर मेरी कोम, विकास कृष्णन व विजेंदर सिंह यांनी दुःख व्यक्त केले. ‘‘डिंको सिंग एक स्पोर्टिंग सुपरस्टार आणि अद्भुत असा बॉक्सर होता. त्याने कारकिर्दीत अनेक पदके जिंकली, तर अनेक खेळाडूंना घडविण्यात योगदान दिले. या प्रतिभावान बॉक्सरच्या अवेळी निधनामुळे आम्ही दुःखी झालोत. ओम शांती,’’ अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.

ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा धुव्वा

1989मध्ये अंबाला येथे ज्युनियर नॅशनल बॉक्सिंग स्पर्धा जिंकल्यानंतर डिंको सिंगच्या नावाचा डंका सुरू झाला. हा येत्या काळातील सुपरस्टार असणार हे राष्ट्रीय प्रशिक्षकांनी हेरले होते. 1997मध्ये डिंको सिंगने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवले. त्याच वर्षी त्याने बँकॉकमध्ये झालेली पिंग्ज कप स्पर्धा जिंकली. डिंको सिंगने आशियाई स्पर्धेतील सुवर्ण पदकाच्या प्रवासात थायलंडचा सोनताया वाँगप्रेट्स व उझबेकिस्तानचा तिमूर तुलयाकोव या ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा धुक्वा उडवला होता. त्यामुळे अल्पावधीत तो हिंदुस्थानच्या बॉक्सिंगशौकिनांच्या गळ्यातील ताईत बनला होता.

डिंकोच्या जीवनावर येणार चित्रपट

डिंको सिंग हा हिंदुस्थानचा सर्वोत्तम बॉक्सर होता. या महान बॉक्सरच्या जीवनावर तयार होत असलेला चित्रपट 2022मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. शाहीद कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तब्येत बिघडल्यामुळे डिंको सिंगला गेल्या वर्षी मणिपूरहून विमानाने दिल्लीला आणण्यात आले होते. मात्र कावीळ झाल्यामुळे त्याचे कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्याला रुग्णवाहिकेतून 2400 कि.मी. लांब असलेल्या मणिपूरला नेण्यात आले होते.

हिंदुस्थानी बॉक्सिंगमध्ये क्रांती

डिंको सिंगने 1998मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देशातील बॉक्सिंग क्रांतीला जन्म दिला. याच वर्षी डिंको सिंगला प्रतिष्ठsच्या अर्जुन आणि 2013मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सहा वेळची जगज्जेती एम.सी. मेरी कोम आणि एल सरिता देवी यांचे प्रेरणास्थान असलेल्या डिंको सिंगने देशाच्या नौदलात सेवा केली आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले. मात्र आजारपणामुळे काही वर्षांपासून ते घरीच होते.

आपली प्रतिक्रिया द्या