
ठाण्यातून हरवलेला मुलगा अखेर वांद्रे येथे सापडला. वडिलांसोबत खरेदीला गेल्यावर घरी जाताना त्याने रिक्षा बदली करून तो ठाण्याहून वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे आला. अखेर त्या मुलाला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले.
मूळचा ठाण्याचा रहिवासी असलेला तो मुलगा इंजिनीअरचे शिक्षण घेतो. अभ्यासात हुशार असलेल्या त्या मुलाला गेल्या वर्षी एटीकेटी लागली होती. तेव्हापासून तो मुलगा विचित्र वागू लागला. त्या मुलाला त्याचे कुटुंबीय कुठेही एकटे पाठवायचे नाही. सोमवारी दुपारी तो मुलगा वडिलांसोबत खरेदीसाठी ठाणे येथे गेला होता. खरेदी झाल्यावर त्याला वडिलांनी रिक्षाने घरी जायचे असल्याचे सांगितले. मुलाला रिक्षात बसवल्यावर त्याचे वडील रिक्षात बसण्यासाठी येत होते, तेव्हा मुलाने वडिलांची नजर चुकवून दुसऱया रिक्षाने तो ठाण्याहून थेट वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे आला.
तेथे काही वेळ काढल्यानंतर तो माहीम कॉजवे येथे आला. तो रस्त्याच्या मधोमध उभा राहत होता. त्यामुळे त्या मुलाचा अपघातही झाला असता. हा प्रकार डय़ुटीवर असलेले उपनिरीक्षक पोळ आणि पोलीस शिपाई विकास बाबर, प्रमोद मुळीक यांच्या लक्षात आला. पोलिसांनी त्या मुलाला वाहतूक चौकीत आणले. विश्वासात घेऊन विचारपूस केली. पोलिसांना त्या मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या वडिलांचा नंबर दिसला. त्या नंबरवर पोलिसांनी फोन करून मुलाची माहिती त्याच्या वडिलांना दिली आणि त्या मुलाला पालकांच्या स्वाधीन केले.





























































