सासरच्या लोकांविरुद्ध तक्रार केल्याने जातपंचायतीचा महिलेसह कुटुंबावर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

सासरच्या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली तसेच जातपंचायतीचा सन्मान केला नाही म्हणून एका विवाहितेसह तिच्या माहेरील मंडळींवर वैदू समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कार टाकल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीमधील 7 जणांविरोधात जालना जिल्ह्यातील व भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून चालत आलेली जातपंचायतीची जुलमी राजवट कधी संपणार असा प्रश्न या घटनेमुळे उभा राहिला आहे.

पती,सासरे आणि सासरची मंडळी पैशासाठी माझा छळ करुन मानसिक त्रास देतात, अशी तक्रार एका 28 वर्षाच्या विवाहितेने पोलिसात दिली. या तक्रारीची माहिती या महिलेच्या सासरकडील मंडळींना मिळाली. त्यामुळे वैदू समाजाच्या जात पंचायतीने पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे जात पंचायतीची बैठक बोलावली. या बैठकीत सासरच्या मंडळींचा मान राखला नाही आणि जात पंचायतीचा सन्मान केला नाही म्हणून विवाहितेसह तिचे आई-वडील आणि माहेरकडील कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. जातपंचायतीच्या या निर्णयानंतरही विवाहित महिला नातेवाईकांच्या लग्नासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे गेली तिथे तिला लग्नातून हाकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शिवाय या महिलेला मोगलाई माल म्हणून चिडवून शिवीगाळ करण्यात आली.

पीडित महिलेसह तिच्या माहेरच्या मंडळींवर जात पंचायतीने बहिष्कार टाकल्याने पीडित महिलेने जालना जिल्ह्यातील व भोकरदन हसनाबाद पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलिसांत 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्या शिवरकर,अण्णा गोडवे,मोतीराम चव्हाण,श्यामराव शिंदे,बाळासाहेब लोखंडे, तात्या शिंदे आणि आणखी एका जणांविरोधात हसनाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.शेकडो वर्षांपासून जात पंचायतींची मनमानी सुरु आहे. अनेक वेळा जात पंचायतीतील लोकांविरोधात गुन्हे दाखल झाले. पण अशा घटनांना जरब बसेल अशी कारवाई झालीच नाही. त्यामुळे जात पंचायतींच्या जुलमी राजवटीत अजूनही अत्याचार आणि अन्याय सुरुच आहे.त्यामुळे जात पंचायतीची जुलमी राजवट कधी संपणार हाच मोठा प्रश्न आहे.