
सार्वत्रिक विधानसभा निकडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ हे ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर गुरुवारपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे.
दाखल तक्रारींपैकी 490 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले. आदर्श आचारसंहितेचा भंग करणे, निवडणुकीच्या अनुषंगाने खोटय़ा बातम्या प्रसिद्ध करणे अशा विविध घटना आढळून आल्यास मतदार स्वतः भारत निवडणूक आयोगाच्या या ऍपद्वारे तक्रार करू शकतात. प्रतिबंधित कालावधीत प्रचार करण्याच्या 52 तक्रारी, शस्त्राचे प्रदर्शन किंवा धाकदपटशा करण्याच्या 2 तक्रारी, कुपन किंवा भेटवस्तू देण्याच्या 13 तक्रारी, पैसे वितरित करण्याच्या 12, मद्य वितरित करण्याच्या 14, विनापरवाना पोस्टरच्या 589, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांसंदर्भातील 9 तक्रारी, विनापरवाना वाहनांचा वापर करणाऱ्या 22 तक्रारी, ध्वनिक्षेपकाचा निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वापराच्या 8 तक्रारी आणि इतर 471 तक्रारींचा यात समावेश आहे.

























































